Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:48 IST2025-10-30T18:47:48+5:302025-10-30T18:48:58+5:30
Uttar Pradesh Murder: अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या एकुलत्या एक मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथून धक्कादायक माहिती समोर आली. अवैध संबंधांमध्ये अडथळा आणि पैशाच्या लालसेतून एका आईने तिच्या प्रियकरसोबत मिळून एकुलत्या एक मुलाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आईसह तिच्या प्रियकराला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता नावाच्या एका महिलेचे पती संदीप कुमार यांच्या मृत्युनंतर गावातील मयंक कटियार या नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. तर, ममताचा मुलगा प्रदीप हा आंध्र प्रदेशात कामाला होता आणि दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी परतला. गावकऱ्यांकडून आईच्या अवैध प्रेमसंबंधांबद्दल कळताच प्रदीपने या नात्याला तीव्र विरोध केला. ममता आणि मयंक त्यांच्या अवैध संबंधांतील हा अडथळा दूर करण्यासाठी प्रदीपच्या हत्येचा कट रचला.
प्रदीपच्या हत्येच्या काही दिवस आधी, ममता आणि मयंक यांनी प्रदीपच्या नावाने ४० लाख रुपयांच्या चार विमा पॉलिसी काढल्या. प्रदीपचा मृत्यू अपघात म्हणून दाखवल्यास मोठे पैसे मिळतील, अशी त्यांची योजना होती. मयंकने त्याचा धाकटा भाऊ ऋषी कटियारला या गुन्ह्यात सहभागी करून घेतले. घटनेच्या दिवशी, ऋषीने प्रदीपला एका हॉटेलमध्ये जेवायला नेले आणि वाटेतच त्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह मृतदेह कानपूर-इटावा महामार्गावरील डेरापूर पोलिस ठाणे परिसरात फेकून दिला.
दरम्यान, २७ ऑक्टोबर रोजी प्रदीपचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अपघाताचा संशय व्यक्त केला. मात्र, मृताचे आजोबा जगदीश नारायण यांनी थेट पोलिसांकडे जाऊन ममता आणि मयंक यांच्या अवैध प्रेमसंबंधांबद्दल सांगितले. गावकऱ्यांनीही पोलीस ठाण्यात जमाव केल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. तपास सुरू असतानाच, अंगदपूरजवळ पोलिसांनी आरोपी ऋषी कटियारला घेराव घातला. त्यावेळी ऋषीने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ऋषीच्या पायाला गोळी लागली आणि त्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
अतिरिक्त एसपी राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर मयंक कटियारलाही बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली असून, हत्येमध्ये वापरलेला हातोडा जप्त करण्यात आला. अवैध प्रेमसंबंध लपवण्यासाठी आणि विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आईने प्रियकरासोबत मिळून मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी ऋषी कटियारवर यापूर्वीही दरोडा, चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.