हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:58 IST2023-09-25T15:57:35+5:302023-09-25T15:58:31+5:30
मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली.

हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला लागून असलेल्या शामली जिल्ह्यातील कैराना भागात धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी क्लिनिकमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन नवजात बाळांचा रविवारी एअर कंडिशनरच्या थंडीमुळे मृत्यू झाला. मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली.
रविवारी सकाळी कुटुंबीय मुलांना पाहण्यासाठी गेले असता, दोघेही मृतावस्थेत आढळून आले. एचएचओ नेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, डॉ. नीतू यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी (एसीएमओ) डॉ. अश्वनी शर्मा यांनी सांगितले. तक्रारीनुसार, शनिवारी कैराना येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी त्यांना खासगी क्लिनिकमध्ये हलवण्यात आले.
थंडीमुळे मुलांचा झाला मृत्यू
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बसेरा गावातील रहिवासी नाझिम आणि कैराना येथील साकिब यांच्या दोन नवजात बाळांना उपचारासाठी फोटोथेरपी युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री झोपण्यासाठी नीतूने एअर कंडिशनर चालू केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे कुटुंबीय त्यांना तपासण्यासाठी गेले तेव्हा दोन्ही मुले युनिटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पीडित कुटुंबीयांनी या घटनेचा निषेध करत डॉ. नीतू यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.