आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:04 IST2025-11-25T13:01:41+5:302025-11-25T13:04:19+5:30
Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: "ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; त्यांच्या आत्म्याला आज समाधान मिळाले असेल"

आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा (धार्मिक ध्वज) फडकवली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी दिल्लीहून महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचले आणि तेथून हेलिकॉप्टरने साकेत कॉलेजला पोहोचले. साकेत कॉलेजहून पंतप्रधान मोदी रोड शो च्या माध्यमातून पुढे राममंदिरात पोहोचले आणि त्यांनी मूळ मंदिरात धर्मध्वजा फडकवली.
"या दिवसासाठी अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मंदिर बांधण्यास वेळ लागतो. हा धर्मध्वज आहे, त्याचा भगवा रंग आहे. या धर्मध्वजात रघुकुलाचे प्रतीक असलेले कोविदार वृक्ष आहे. कोविदार वृक्ष हे दोन पवित्र वृक्षांच्या गुणांचे मिश्रण आहे. आपल्याला धर्मध्वज शिखरावर उंचावायचा आहे. आजचा दिवस आपल्या संकल्पाची पूर्ती करण्याचा दिवस आहे. आपल्याला शांती पसरवणारा आणि सर्वांना समृद्धी देणारा भारत स्थापन करायचा आहे. हे मंदिर काही लोकांनी स्वप्नात पाहिले होते, आज तसे मंदिर 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळणे ही शुभ गोष्ट आहे," अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावना व्यक्त केल्या.
"आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. इतक्या लोकांनी स्वप्न पाहिले, इतक्या लोकांनी प्रयत्न केले, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; आज त्यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल. आज अशोकजींना खरोखरच शांती मिळाली असेल. त्यांनी आपले प्राण अर्पण केले आणि अनेकांनी घाम गाळला. काहींनी बलिदान दिले, पण जे मागे राहिले त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांच्या मनात मंदिर बांधले जावे अशी इच्छा सतत होते. आज राम मंदिर बांधण्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली. ध्वज फडकवण्यात आला. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला याचा मला अभिमान आहे," असेही मोहन भागवत म्हणाले.