कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:16 IST2025-11-10T12:15:48+5:302025-11-10T12:16:38+5:30
"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती."

कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनडीए उमेदवारांसाठी अररियातील सिकटी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. येथे भाजपाने आमदार विजयकुमार मंडल यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला केले.
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राजद आणि महागठबंधनावर बिहारमध्ये “जंगलराज” आणल्याचा आरोप केला. योगी म्हणाले, गौरवशाली इतिहास असलेल्या बिहारसमोर संकटे निर्माण करणारेच खरे अपराधी आहेत. ज्यांनी राज्य मागे ढकलले. नागरिकांसमोर ओळखीचे संकट निर्माण केले. आता हे लोक, मोठ-मोठ्या घोषणा करत आहेत आणि नोकरीच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्यांचा भूतकाळ कलंकित आणि काळा आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राजदच्या काळात बिहारसमोर साक्षरतेचे संकटही उभे होते. मात्र २००५ मध्ये जेव्हा नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आले, तेव्हा बिहारने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सिव्हिल सर्व्हंट, आयएएस, आयपीएस, आयएफएस, स्टार्टअप, उद्योजक आदी अनेक क्षेत्रांत काही तरी नवे करत, देश आणि जगासाठी मॉडेल तयार करत आहेत. बिहारच्या विकासाची ही यात्रा थांबूनये.
विरोधकांवर टीका करताना योगी म्हणाले, “काँग्रेस आणि राजदची जोडी म्हणजे विकासाला 'जंगलराज'मध्ये बदलणारी जोडी आहे.” राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती. यांच्या शासन काळात व्यापारी, इंजिनिअर, डॉक्टर, मुले आणि मुलीही सुरक्षित नव्हत्या.
दरम्यान योगी यांनी राममंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काँग्रेस-राजद हे “रामद्रोही” आहेत, तर मोदीजींच्या नेतृत्वात आस्थेचा सन्मान, विकास आणि गरीब कल्याण यांसाठी कार्य केले गेले. केंद्र सरकारच्या योजनांमुळे काँग्रेस-राजदची दलाली संपुष्टात आली आहे. आता पैसे थेट लाभारऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. यावेळी, बिहारमध्ये पुन्हा जंगलराज येऊ द्यायचे नाही, असे आवाहनही त्यांनी जनतेला गेले.