जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:35 IST2025-10-07T13:35:25+5:302025-10-07T13:35:56+5:30
उत्तर प्रदेशात २३,७७१ अपघातात २२ हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे.

जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जर एखादा व्यक्ती कुठल्याही अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात आणत असेल तर त्याला राज्य सरकार सन्मानित करणार आहे. अपघातातील जखमींचा जीव वाचावा आणि कुणीही जखमींना मदत करण्यापासून मागे हटू नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. राहवीर असं योजनेला नाव देण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातानंतर १ तासाच्या आत जखमींना उपचार मिळू शकावा आणि त्याचा जीव वाचावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जर कुणाच्या डोळ्यादेखत अपघात झाला असेल तर त्या अपघातातील जखमींना १ तासांत रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तीला राहवीर दर्जा दिला जाईल आणि त्याला सन्मानित केले जाणार आहे. परिवहन विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. २०२३ साली भारतात १.७ लाख अपघातात १.६ लाख लोकांचा जीव गेला. उत्तर प्रदेशात २३,७७१ अपघातात २२ हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे.
याबाबत परिवहन आयुक्त किंजल सिंह यांनी मदत करणाऱ्या व्यक्तीला राहवीर असं संबोधले जाईल. ही योजना आपत्कालीन स्थिती लोकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करेल. योजनेत गंभीर दुखापत, ३ दिवस हॉस्पिटलमध्ये भरती, डोक्याला जखम, हाडे मोडणे आणि उपचारात मृत्यू यांचा समावेश आहे. प्रत्येक राहवीराला प्रति अपघातामागे २५ हजार रुपये दिले जातील. एक व्यक्ती अनेक पीडितांची मदत करत असेल तरीही त्याला २५ हजार मिळतील. अनेक जण मिळून एका अपघातग्रस्ताला वाचवत असतील तर ही रक्कम विभागून दिली जाणार आहे. पारदर्शकतेसाठी पोलीस घटनेचा तपास करेल.
पोलीस आणि सीएमओ देणार पुरस्कार
पोलीस राहवीरचं नाव, संपर्क आणि पीडितेची माहिती गोळा करेल. ही माहिती जिल्हा मॅजिस्ट्रेट अध्यक्षतेखालील समितीला पाठवेल. सरकारकडून मदत करणाऱ्या व्यक्तीला राहवीरचा दर्जा दिला जाईल. त्याशिवाय कायदेशीर संरक्षणही देईल. ज्यामुळे कुणीही व्यक्ती मदतीपासून घाबरणार नाही. याआधी जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रूपये दिले जायचे परंतु आता ही रक्कम २५ हजार केली आहे. त्याशिवाय जर मोठा अपघात घडला, ज्याची चर्चा राज्य पातळीवर होईल त्या अपघात मदत करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रूपये बक्षीस म्हणून दिले जातील असं परिवहन खात्याने स्पष्ट केले आहे.