‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’, स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 21:12 IST2023-10-16T21:11:04+5:302023-10-16T21:12:20+5:30
Swami Prasad Maurya Statement on Ram Mandir: गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’, स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान
गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी भव्यदिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. त्याचदरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी या प्राणप्रतिष्ठापनेवरून वादग्रस्त विधान केलं आहे.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम म्हणजे फसवणूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय बौद्ध महोत्सवात आयोजित एका कार्यक्रमामध्ये रामायणामधील एक चौपाई वाचून दाखवत मौर्य यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्यात ते म्हणाले की, सरकार अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग रचून तरुण आणि देशातील लोकांची फसवणूक करण्याचं काम करत आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या विधानानंतर संतमहंतांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी सांगितले की, स्वामी प्रसाद मौर्य यांनी प्राणप्रतिष्ठापनेचा फसवणूक असा उल्लेख करणं हे दाखवून देत आहे की, ते पूर्णपणे वेडे झाले आहेत. त्यांना वेळ न दवडता वेड्यांच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. मला वाटतं की, त्यांनी चुकून सनातन धर्मामध्ये जन्म घेतला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य ज्याप्रकारे सनातन धर्माचा सातत्याने अपमान करत आहेत, ते पाहता अखिलेश यादव यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. तसेच मौर्य यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. ही व्यक्ती दररोज गरळ ओकत असते, असेही त्यांनी सांगितले.