अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 07:14 AM2024-01-13T07:14:49+5:302024-01-13T07:17:26+5:30

१० पंडितांच्या चमूकडून अखंड यज्ञकर्म; येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी

So that the construction of the temple in Ayodhya should be done without any problem, Yagna is being done in the Ramnivas temple for a year. | अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, बाधा त्यात येऊ नये, यासाठी अयोध्येतच एक वर्षापासून अनोखा यज्ञ सुरू आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी वसंत पंचमीला तो सुरू झाला.  
रामकोट भागातील रामनिवास मंदिरात हा यज्ञ अखंड सुरू आहे. केवळ मंदिराचे काम विनासंकट व्हावे, एवढाच त्याचा उद्देश नाही, तर राम मंदिराची उभारणी करत असलेल्या सामान्य बांधकाम मजुरांपासून संबंधित सर्वांच्याच आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये, हादेखील उद्देश असल्याचे यज्ञाचे प्रभारी आचार्य गोपाल पांडेय यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
अयोध्या आणि परिसरातील १० पंडितांची एक चमू एक आठवड्यापर्यंत यज्ञकर्म करते. नंतरच्या आठवड्यात चमू बदलते. या पंडितांच्या आराम व भोजनाची व्यवस्था मंदिर परिसरातच आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार हे अलीकडेच एक दिवसासाठी यजमान बनले होते.

सकाळी ८ वाजता यज्ञ सुरू होतो. दोन तासांच्या यज्ञानंतर सूर्यास्तापर्यंत अखंड रामनाम संकीर्तन चालते. त्यानंतर देवदेवतांचे पूजन व अभिषेक केला जातो. नवग्रह हवन, अष्टोत्तर रामनाम हवन आणि आरती होते.

दरदिवशी वेगवेगळी पूजा

आठवड्यातील दरदिवशीची विशिष्ट पूजा वेगवेगळी असते. सोमवारी रुद्राभिषेक, मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण, बुधवारी गणपती अथर्वशीर्ष पठण, गुरुवारी पुरुष सुक्त, शुक्रवारी श्रीसुक्त ऋग्वेद, शनिवारी सुंदरकांड पाठ होतो.

येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी

नाशिक जिल्ह्यातील येवला या पैठणीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या शहरातून अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणारे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाच्या मूर्तींसाठी पैठणी व अन्य भरजरी वस्त्र पोहोचले आहेत. विशेष म्हणजे तीनशे दिव्यांग कारागिरांनी ही वस्त्रे तयार केली आहेत. येवला येथील कापसे फाऊंडेशनने ही अनोखी भेट पाठविली आहे. मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी ही भेट स्वीकारली.

Web Title: So that the construction of the temple in Ayodhya should be done without any problem, Yagna is being done in the Ramnivas temple for a year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.