रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 13:37 IST2024-01-21T13:37:04+5:302024-01-21T13:37:35+5:30
अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट'
Ram Mandir Ayodhya, Cyber Attack Threat on Live broadcast : अनेक महिन्यांपासून संपूर्ण भारत देश ज्या दिवसाची वाट पाहत आहे, तो दिवस उद्यावर येऊन ठेपला आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सुमारे ८ हजार लोकांच्या यादीत राजकीय पाहुण्यांच्या नावांचाही समावेश आहे. यासोबतच प्रमुख राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपट अभिनेते, मुत्सद्दी यांचा समावेश आहे. याच दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे.
राम मंदिर सोहळ्याचे आणि प्राणप्रतिष्ठा विधीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याच प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारकडून इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी सर्व विभाग प्रमुखांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सरकारी वेबसाइट्स आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना सायबर सुरक्षा कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले आहेत की २२ जानेवारी २०२४ हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यांच्याप्रमाणेच सर्व रामभक्त, कारसेवक आणि आंदोलक सोमवारची वाट पाहत आहेत. अयोध्येतील तयारी जवळपास पूर्ण झाली असून रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य होणार आहे. २२ जानेवारीच्या संध्याकाळी रामनगरी अयोध्या १० लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. राम मंदिरात रामललाचा सोहळा झाल्यानंतर १० लाख दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. घरोघरी, दुकाने, प्रतिष्ठान आणि पौराणिक ठिकाणी ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार आहेत. हे दिवे सरयू नदीच्या काठावरील मातीपासून बनवण्यात आले आहेत.