पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:34 IST2025-11-03T17:33:23+5:302025-11-03T17:34:13+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात इंडी आघाडीवर थेट निशाणा साधला.

पप्पू-टप्पू-अप्पूंना विकास दिसत नाही; बिहारमध्ये आता रामराज्याचा उदय होणार! मुख्यमंत्री योगींचा हुंकार
बिहार विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी धडाकेबाज प्रचार करत राजकीय पारा चांगलाच चढवला आहे. सोमवारी दरभंगा जिल्ह्यातील केवटी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना, योगींनी विरोधकांवर विशेषतः इंडी आघाडीवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीला 'रामद्रोही' म्हणत, त्यांच्या आघाडीची तुलना गांधीजींच्या तीन माकडांच्या उलट्या अवताराशी केली – ज्यांना 'विकास दिसत नाही, प्रगतीची कुजबुज ऐकू येत नाही आणि सत्य बोलता येत नाही!'
'पप्पू-टप्पू-अप्पू'ला विकास दिसत नाही!
मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात इंडी आघाडीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "आज इंडी आघाडीचे तीन माकडं आहेत - पप्पू, टप्पू आणि अप्पू." याचा अर्थ स्पष्ट करताना योगी म्हणाले की, "पप्पू सत्य बोलू शकत नाही, टप्पू चांगले पाहू शकत नाही आणि अप्पू चांगले ऐकू शकत नाही. त्यामुळेच या तिघांनाही पंतप्रधान मोदींचा विकास दिसत नाही आणि देशाच्या प्रगतीची सुगंधही जाणवत नाही."
रामद्रोही शक्तींना मिथिलाचा स्पष्ट संदेश: आता बिहारमध्ये 'रामराज्य'
माता जानकीची पावन भूमी असलेल्या मिथिलातून योगींनी काँग्रेस आणि आरजेडीला स्पष्ट संदेश दिला. "या रामद्रोही शक्तींना बिहारमध्ये रामराज्याचा उदय होत आहे, हे मिथिला दाखवून देईल", असे ते म्हणाले. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात रामसेतू आणि भगवान राम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते, तर काँग्रेस-आरजेडी आणि समाजवादी पक्षाच्या सरकारने अयोध्येतील रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या, याची आठवण योगींनी करून दिली. "जे राम आणि माता जानकीचे विरोधी आहेत, ते भारताचे आणि मिथिलाचेही विरोधी आहेत," असे ते ठामपणे म्हणाले.
डबल इंजिनचा फायदा: काशी ते मिथिलापर्यंत बदलले चित्र
डबल इंजिन सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडताना योगींनी धार्मिक आणि विकासात्मक कार्यांवर जोर दिला. "पाच वर्षांपूर्वी मी येथे येऊन अयोध्येत राम मंदिर बनेल, असे सांगितले होते आणि आज रामलला विराजमान आहेत. त्याच धर्तीवर, सीतामढीमध्ये माता जानकीचे मंदिरही आमचे डबल इंजिन सरकार उभारत आहे," असे ते म्हणाले.
योगींनी कनेक्टिविटीवरही भाष्य केले
राम-जानकी मार्गाचे युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे, जो अयोध्या आणि मिथिलाला भावनिकरित्या पुन्हा जोडेल. २००५ पूर्वी अयोध्या ते दरभंगा या प्रवासाला १६ तास लागायचे, मात्र आता लखनऊ ते दरभंगा केवळ ४५ मिनिटांत पोहोचता येते! हाच डबल इंजिन सरकारच्या दुप्पट वेगाचा फायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
मखाना बोर्ड, लाख चूडी उद्योग - मिथिलाला नवी ओळख
पंतप्रधान मोदींनी मिथिलाच्या ओळखीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. दरभंगाच्या मखाना उद्योगासाठी राष्ट्रीय बोर्ड स्थापन करून आणि लाखच्या बांगड्यांना नवी ओळख देऊन मिथिलाचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. बिहारमध्ये आज रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्ग अशा चोहोबाजूने कनेक्टिव्हिटीचे जाळे विणले गेले आहे.
नरसंहाराचा काळ गेला, आता विकास आणि न्याय!
काँग्रेस-आरजेडी सरकारच्या काळात बिहार नरसंहाराने ग्रासले होते, अपहरण हा उद्योग बनला होता आणि महिला-व्यापारी भीतीच्या छायेखाली होते. मात्र, आता एनडीएच्या राजवटीत दंगली नाहीत, भय नाही. "यूपीप्रमाणे बिहारलाही माफिया आणि अराजकतेपासून मुक्त करायचे आहे," असे सांगताना त्यांनी उत्तर प्रदेशातील माफियांच्या छातीवर बुलडोझर चालवल्याचा उल्लेख केला. लूटलेल्या संपत्तीवर गरिबांसाठी घरे बांधून देणे हीच 'न्यायाची नवी परिभाषा' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कलम ३७० हटवल्याने मिथिलाच्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान
काश्मीरला विवादित करण्याची पापे काँग्रेसने केली होती. त्यामुळे मिथिलाचा माणूस तिथे सन्मानाने राहू शकत नव्हता. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून हा अन्याय दूर केला. आता बिहार आणि मिथिलातील कोणीही तिथे जाऊन सन्मानपूर्वक राहू शकतो, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व सांगितले.
एनडीए म्हणजे विकास, वारसा आणि विश्वास
आपले भाषण संपवताना मुख्यमंत्री योगींनी एनडीएचा अर्थ स्पष्ट केला: विकास, वारसा आणि विश्वास. त्यांनी जनतेला आवाहन केले की, एनडीए हा सुशासनाचा आणि गरिबांच्या कल्याणाचा प्रतीक आहे, तर विरोधक अराजकता आणि जातीय हिंसेचे प्रतीक आहेत. "तुम्ही विभागले जाणार नाही, तर कापलेही जाणार नाही. एकत्र राहाल, तर चांगले राहाल आणि बिहार सुरक्षित राहील. एनडीए विजयी होईल, तर बिहार विजयी होईल," असे सांगत त्यांनी केवटीतून भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.