पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 08:40 IST2025-05-01T08:39:54+5:302025-05-01T08:40:29+5:30
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती बनवून तपास करण्याचे आदेश दिलेत

पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली इथं शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणानं संपूर्ण देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. याठिकाणी ९ वर्ष पाकिस्तानी महिला शिक्षण विभागात नोकरी करत होती. विभागीय अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब लपवून ठेवली. काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही महिला अचानक गायब झाली आहे. गुप्तचर यंत्रणेसह पोलिसांची ८ पथके तिचा शोध घेत आहेत परंतु महिलेचा थांगपत्ता लागला नाही.
देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती बनवून तपास करण्याचे आदेश दिलेत. पाकिस्तानात राहणारी शुमायला खान यूपीत सरकारी नोकरी करत होती याचा खुलासा झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. शुमायला खानने बनावट कागदपत्रांच्या आधारे २०१५ साली बरेली जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात नोकरी मिळवली. ९ वर्ष विभागीय अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून शुमायला खान हिला अभय दिले. २ वर्षापूर्वी शुमायला खान पाकिस्तानी असल्याचं समोर आले तेव्हा विभागीय अधिकाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली हे प्रकरण दडपून ठेवले.
आता शुमायला खान रहस्यमयरित्या गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यामुळे देशात संतापाची लाट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गुप्तचर यंत्रणेपासून सुरक्षा जवान अलर्ट आहेत. त्यातच पाकिस्तानी महिला शुमायला खान अचानक गायब झाल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ९ वर्षात पाकिस्तानी महिलेने बरेलीसह आसपासच्या ठिकाणांची माहिती जमा केलीय का, तिच्या हालचाली काय होत्या याची उत्तरे कुठल्याही अधिकाऱ्यांकडे नाहीत. देशातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून शोधून भारताबाहेर काढले जात आहे त्यात शुमायला खान गायब झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.