आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:12 IST2024-12-08T17:12:26+5:302024-12-08T17:12:54+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी येथील एरच पोलस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलिहा टोला गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पब्जी खेळण्यापासून अडवल्याने एका १४ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं.

आईने PUBG खेळण्यापासून अडवले, नाराज झालेल्या अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचं पाऊल....
उत्तर प्रदेशमधील झाशी येथील एरच पोलस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलिहा टोला गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पब्जी खेळण्यापासून अडवल्याने एका १४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांना शोक अनावर झाला आहे. या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याची चटत लागली होती. आईने त्यावरून चार शब्द सुनावल्याने रागाच्या भारात या मुलाने टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एरच परिसरातील मलिहा टोला गावात घडली आहे. येथे राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाला पब्जी खेळण्याचं व्यसन होतं. त्यावरून त्याची आई त्याला सारखी ओरडायची. ही घटना घडली त्या दिवशीही सदर मुलगा गेम खेळत होता. जेव्हा त्याच्या आईने त्याला गेम खेळण्यापासून रोखले तेव्हा नाराज होऊन तो घराबाहेर निघून गेला.
त्याच्या आईने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो कुठेच दिसून आला नाही. काही वेळाने घराबाहेर पडलेला हा मुलगा एका झाडावर चढला. तसेच आईने अडवण्यापूर्वीच त्याने गळफास घेतला. हे दृश्य पाहून हादरलेल्या आईने आरडाओरडा केला. तो ऐकून कुटुंबातील आणि आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी या मुलाला खाली उतरवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मृत मुलाच्या काकांनी सांगितले की, माझ्या पुतण्याचं वय १४ वर्षे होतं. तो मोबाईलवर गेम खेळायचा. तो पूर्ण दिवस मोबाईलवर गुंतून राहायचा. त्यावरून त्याची आई त्याला ओरडायची. त्या दिवशीसुद्धा त्याच्या आईने मोबाईलवर गेम खेळण्यावरून त्याला खडसावले होते. त्याचं त्याला वाईट वाटलं. त्यानंतर शेतापासून काही अंतरावर जात त्याने जीवन संपवलं, अशी माहिती त्यांनी दिली.