Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:24 IST2025-09-30T17:21:04+5:302025-09-30T17:24:15+5:30
घाघरा नदीकाठच्या भागात लांडगे आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बहराइच जिल्ह्याचा दौरा केला.

Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
घाघरा नदीकाठच्या भागात लांडगे आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बहराइच जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी मांझारा, तौकली आणि कैसरगंज या गावांमधील बाधित कुटुंबांची भेट घेऊन हवाई पाहणी केली आणि पीडितांच्या वेदना जाणून घेतल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांनी वन्यप्राण्यांच्या वाढत्या दहशतीवर मोठा आणि कठोर निर्णय जाहीर केला.
"लांडगा पकडला गेला तर ठीक, नाहीतर गोळी घाला!"
मुख्यमंत्र्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, लांडग्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. "जर लांडगा पकडला गेला नाही, तर वन विभागाने तातडीने शूटरला बोलावून त्याला मारण्याची कारवाई करावी. लोकांना यातून मुक्त केले पाहिजे," असे निर्देश त्यांनी दिले.
४ मुलांचा मृत्यू; ५ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये कैसरगंज आणि महसी भागातील चार मुलांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झाले आहेत. सरकारने मानव-वन्यजीव संघर्षाला आपत्ती म्हणून वर्गीकृत केले आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच, जखमींवर मोफत उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांना खासदार/आमदारांमार्फत प्रत्येकी ५०,००० रुपये तात्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गस्त वाढवली
संपूर्ण प्रदेशात ग्राम रोजगार अधिकारी, पंचायत सहायक आणि ग्राम पहारेकरी यांचा समावेश असलेली २१ कार्यदले जनजागृती आणि संरक्षणासाठी काम करत आहेत. वन विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहा विशेष पथके तयार केली आहेत. १,४३७ एलईडी पथदिवे, ६६० पथदिवे आणि ९१ सौर दिवे बसवण्यात आले. पोलीस आणि वीज विभागानेही गस्त वाढवली आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, ज्यांना कायमस्वरूपी घरे नाहीत त्यांना ती उपलब्ध करून द्यावीत. तसेच, ज्या घरांना दरवाजे नाहीत, तेथे अनुदानित दरवाजे आणि तात्काळ शौचालये बांधण्याची व्यवस्था करावी. जखमींना रेबीजविरोधी लस देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच "डबल इंजिन सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत आहे," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडितांना दिले.