मुख्यमंत्री योगींच्या व्हिजनमुळे नशीब बदललं; कौशल्या देवींची यशोगाथा ऐकून मोदींनी कौतुक केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:54 IST2025-09-26T11:52:48+5:302025-09-26T11:54:07+5:30
ग्रेटर नोएडा येथे झालेल्या यूपी आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात पंतप्रधान मोदींनी गोरखपूरच्या लखपती दिदी महिलांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री योगींच्या व्हिजनमुळे नशीब बदललं; कौशल्या देवींची यशोगाथा ऐकून मोदींनी कौतुक केलं
गोरखपूर - गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा तालुक्यातील पशुपालक कौशल्या देवी यांचं आयुष्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दृष्टीकोनामुळे पूर्णपणे बदलून गेले आहे. एकेकाळी दोनच जनावरांवर उदरनिर्वाह करणाऱ्या कौशल्या आज ‘श्री बाबा गोरखनाथ कृपा मिल्क प्रोड्युसर ऑर्गनायझेशन’ (एमपीओ) च्या माध्यमातून “लखपती दीदी” म्हणून ओळखल्या जात आहेत. गुरुवारी ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘यूपी इंटरनॅशनल ट्रेड शो’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्या देवींशी संवाद साधून त्यांची यशोगाथा ऐकली आणि त्यांचे कौतुक केले. यापूर्वी जुलै महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये झालेल्या पशुपालन परिषदेत कौशल्या यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते.
कौशल्या देवी यांनी म्हटलं की, एमपीओशी जोडल्यावर माझे जीवनच बदलले. केवळ दीड वर्षांत मी पशुपालन आणि दूध संकलनातून सुमारे १४ लाख रुपयांची कमाई केली आहे. आधी माझ्याकडे फक्त दोनच जनावरे होती, आता ती १४ वर पोहोचली आहेत. याशिवाय सहा महिन्यांपूर्वी एमपीओच्या मदतीने त्यांच्या घरी गोबर गॅस युनिट बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता घरगुती स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर खरेदी करण्याची गरजच उरलेली नाही असं त्यांनी सांगितले.
३१ हजार महिला शेयरहोल्डर्स, ११५ कोटींचा टर्नओव्हर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या संस्थेने अल्पावधीत मोठी भरारी घेतली आहे. एमपीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज साहनी यांच्या माहितीनुसार फक्त दीड वर्षांच्या कालावधीत गोरखपूर मंडळातील ३१ हजार महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. संस्थेचा टर्नओव्हर तब्बल ११५ कोटी रुपये इतका झाला आहे. महिला पशुपालकांकडून दररोज ६५ हजार लिटर दूध संकलन केले जाते. आतापर्यंत महिला शेयरहोल्डर्सना ९३ कोटी रुपयांचे देयक वितरित झाले आहे. एकूण १८४१ महिला या उपक्रमातून ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत असं त्यांनी म्हटलं.
सध्या या एमपीओचे कामकाज गोरखपूर, महाराजगंज, देवरिया आणि कुशीनगर या चार जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. ५०० हून अधिक ‘मिल्क पूलिंग पॉइंट्स’वरून संकलित दूध थेट मदर डेअरीला पुरवले जाते. संस्थेशी जोडलेल्या महिलांना केवळ दूध विक्रीतून उत्पन्न मिळते. त्याशिवाय पशुखाद्य व खनिज मिश्रण, जनावरांच्या रोगांची तपासणी, कृत्रिम गर्भधारणा नोंदणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा सुविधा पशु पालकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परिणामी या संस्थेशी जोडलेल्या महिलांना सरासरी महिन्याकाठी ७–८ हजार रुपये घरी बसून मिळत आहेत.