"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:46 IST2025-08-26T12:44:13+5:302025-08-26T12:46:02+5:30
माझी हकालपट्टी तेव्हा झाली जेव्हा मी सभागृहात माफिया अतीक अहमदचे नाव घेतले. समाजवादी पक्ष गुन्हेगारांबद्दल वाईट ऐकू शकत नाही असा आरोप आमदार पूजा पाल यांनी केला.

"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
लखनौ - चायल विधानसभा मतदारसंघातील आमदार पूजा पाल यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सपाचे माफिया आणि गुंड यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं सपाचे धोरण आहे असा आरोप पत्राद्वारे पूजा पाल यांनी केला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यात पूजा यांनी त्यांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली. जेव्हा माझ्या पतीची हत्या झाली तेव्हा राज्यात समाजवादी पक्षाचं सरकार होते. त्यामुळे सपाचे माफिया गुंड माझीही हत्या करू शकतात असा खळबळजनक दावाही पूजा पाल यांनी केला आहे.
माझ्या पतीच्या मारेकऱ्याला दिली उमेदवारी
पूजा पाल यांनी पत्रात लिहिलंय की, २००५ मध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात माझ्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी प्रयागराजमध्ये मुख्य रस्त्यांवर एके ४७ ने गोळीबार करून दहशत पसरवण्यात आली. माझ्या पतीने माफिया अतीक अहमदचा भाऊ अशरफविरोधात ३ निवडणुका लढवून आव्हान दिले होते. जेव्हा मला आधाराची गरज होती, तेव्हा सपाने माझ्या पतीच्या मारेकऱ्याला माझ्याविरोधात उभे केले. परंतु मतदारसंघातील जनता आणि पाल समाजाने मला साथ दिली आणि गुन्हेगाराला पराभूत केले. माझी महत्त्वाकांक्षा मंत्री बनण्याची नव्हती. मला फक्त माझ्या पतीच्या मारेकऱ्याला शिक्षा द्यायचे होते. योगी सरकारने मला न्याय दिला आणि मारेकऱ्याला मातीत गाडले. परंतु आजही समाजवादी पक्ष गुन्हेगारांना मोठं करण्याचं पाप करत आहे. येणाऱ्या पिढ्या त्यासाठी त्यांना माफ करणार नाही असा टोला पूजा पाल यांनी लगावला.
तसेच राज्यसभेत क्रॉस व्होटिंगमुळे मला पक्षातून काढले असं सांगून समाजात दिशाभूल केली जात आहे. माझी हकालपट्टी तेव्हा झाली जेव्हा मी सभागृहात माफिया अतीक अहमदचे नाव घेतले. समाजवादी पक्ष गुन्हेगारांबद्दल वाईट ऐकू शकत नाही. माझ्यावरील कारवाईने अतीक अहमदच्या कुटुंबाचे मनोबल वाढले आहे. ज्यात अजूनही निम्म्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहेत. योगी सरकारमुळे हे सर्व गप्प बसले परंतु सपाने त्यांना हिंमत दिली आहे. ज्यातून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असं आमदार पूजा पाल यांनी आरोप केला.
"PDA चा अर्थ वारंवार बदलला जातो..."
पूजा पाल यांनी अखिलेश यादव यांच्या PDA म्हणजे पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक फॉर्म्युल्यावर निशाणा साधला. अखिलेश यादव पीडीएचा अर्थ वारंवार बदलतात. मी एका छोट्या आणि वंचित पाल समाजाची मुलगी आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री राहिला आहात तरीही पीडीएबाबत एकवाक्य नाही. समाजवादी पक्षाने किती मागासवर्गीयांना मंत्री बनवले? तुम्ही केवळ तुमचा समाज आणि मुस्लीम समाज यांना प्राधान्य दिले. वंचित समाजासोबत समाजवादी पक्ष कधीच राहू शकत नाही हा इतिहास आहे असंही आमदार पूजा पाल यांनी म्हटलं.
"मला संपवणे सोपे नाही..."
भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांकडून मला कुठलाही धोका नाही. मी संकटांना तोंड देत आयुष्य जगत आली आहे. माझ्यासोबत मतदारसंघातील जनता आहे आणि उत्तर प्रदेशातील मागासवर्गील पाल समाज डोंगरासारखा उभा आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला मला संपवणे सोपे नाही. समाजवादी पक्षाची धोरणे सामाजिक एकतेसाठी घातक आहेत असा आरोपही पूजा पाल यांनी केला आहे.