"भोलेबाबा परम ब्रह्म, ज्यांचं मरण आलं होतं, त्यांचाच जीव गेला’’, सूरजपाल यांच्या सेवेकऱ्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:55 IST2024-07-03T13:15:48+5:302024-07-03T14:55:26+5:30
Hathras stamped Update: हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे.

"भोलेबाबा परम ब्रह्म, ज्यांचं मरण आलं होतं, त्यांचाच जीव गेला’’, सूरजपाल यांच्या सेवेकऱ्याचा दावा
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेसाठी सत्संगाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचं ढिसाळ नियोजन आणि येथे प्रवचन देणारे भोलेबाबा यांना दोषी ठरवण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही भोलेबाबांच्या अनुयायांचं त्यांच्यावरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे. भोलेबाबांच्या आश्रमात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या सत्यवान नावाच्या एका सेवेकऱ्याने बाबा परम ब्रह्म असून, त्यांच्या चरणाच्या धुळीमुळे लोकांचे कष्ट कमी होतात. आमचे बाबा परम ब्रह्म आहेत. त्यांची सर्वांची निर्मिती केली आहे. ज्या लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, त्यांचं मरण जवळ आलं होतं, असा दावा भोलेबाबांच्या सेवेकऱ्यांनी केला आहे.
सत्यवान याने सांगितले की, हा आश्रम येथीलच एका सेवेकऱ्याने आपल्या दान दिलेल्या जमिनीवर बांधण्यात आला आहे. ग्वाल्हेर, कानपूर, लखनौ, शाहजहांपूर, दिल्ली आणि इतर ठिकाणीही त्यांचे आश्रम आहेत. बाबाजी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांचेही दौरे करून आलेले आहेत.
या सत्संगासाठी बहराइस येथून बसमधून काही अनुयायी आले होते. सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांमी सांगितले की, ते पहिल्यांदाच या सत्संगाला आले होते. आम्हाला हे बाबा मानव आहेत की देव हे पाहायचे होते. आमच्या बसमध्ये एक आई आणि मुलगी होती. ते बेपत्ता आहेत. तसेच आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहोत.
दरम्यान, हाथरसमधील दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाथरसमधील रुग्णालयात ३२ मृतदेह आले आहेत. त्यातील १९ जणांची ओळख पटली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले जात आहेत. दरम्यान, एक महिला पोलीस कर्मचारीही बेशुद्ध झाली होती. ती आता ठीक आहे. तिला घरी पाठवण्यात आले आहे.