लग्नमांडवातून पळाला नवरेदव; नवरीने बसमधून पकडून आणले, मग लग्न लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:51 IST2023-05-22T13:49:57+5:302023-05-22T13:51:57+5:30
बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे

लग्नमांडवातून पळाला नवरेदव; नवरीने बसमधून पकडून आणले, मग लग्न लागले
बरेली - जवळपास अडीच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर युवक आणि युवतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी, लग्नाची सर्वच तयारी झाली, लग्नकार्यासाठी मंडप सजला, विधिव्रत तयारीही पूर्ण झाली. मात्र, ऐनवेळी नवरेदवाचा मूड बदलला आणि तो लग्नमांडवातून पळून गेला. खूप वेळ झाला तरी नवरदेव आला नसल्याने स्वत: नवरी मुलगीच नवरदेवाच्या शोधासाठी निघाली. तिकडे बसमधून नवरदेव गाव सोडायच्या तयारीत असतानाच नवरीने त्याला पकडले. त्यानंतर, वापस आणून दोघांचा विधिव्रत लग्नसोहळा संपन्न झाला.
बरेली जिल्ह्यातील या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नमंडपातून पळून गेलेल्या नवरदेवाला नवरी मुलीने पकडून आणले, त्यानंतर जवळील मंदिरात जाऊन लग्नही लावले. जवळपास २ तास हे लग्नाचे नाटक सुरू होते. लग्नासाठी आलेली पाहुणेमंडळीही हा तमाशा पाहात होती. मात्र, धाडसी मुलीने लग्नाचे ७ फेरे घेतल्यानंतरच मुलाचा पाठलाग सोडून दिला.
मुलगा आणि मुलीचे गेल्या २-३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे, मुलीच्या कुटुंबीयांना मुलीला लग्न करण्याचे सूचवले. रविवारी घरगुती सहमतीतून मुलीच्या कुटुंबीयाने भुतेश्वरनाथ मंदिरात लग्नमंडप सजवला होता. त्यासाठी सर्व तयारीही पूर्ण केली. नवरी नटून-थटून बसली, नवरदेवाची वाट पाहिली जात होती. मात्र, तो येईनाच गेल्याने मुलीने त्याला फोन लावून चौकशी केली. त्यावेळी, मुलगा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मुलीला समजले. त्यामुळे, तिने तात्काळ मंडपातून उठून नवऱ्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, लग्नस्थळापासून २० किमी दूरवर बसमध्ये बसून निघणार तेवढ्यात मुलीने नवरदेवाला पकडले. मी माझ्या आईला घेऊन येतो, असे तो म्हणाला. मात्र, मुलीने मुलाचे काहीही ऐकले नाही. याउलट मंदिरात आणून दोघांचे लग्न लावण्यात आले.