पाटणा/नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले असून उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८० हजारहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. ३७ तहसील आणि ४०२ गावांमधील ८४,३९२ लोक पुरामुळे बाधित झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
गंगा नदीला पूर आल्याने तीने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. प्रयागराज, वाराणसी, इटावासह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर आहे. यामुळे अनेक नागरिकांची घरे बुडाली आहेत. राजस्थानातही हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस सुरू आहे.
हिमाचलमध्ये ३०७ मार्ग बंदहिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह ३०७ रस्ते बंद असून, दोन दिवस या राज्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. आसाममध्येही दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आधुनिक युगातले ‘वासुदेव’उत्तर प्रदेशात पडत असलेल्या मुसळधार पावसाने सखल भागांतील अनेक घरे पाण्यात आहेत. रस्त्यांवरही छातीइतके पाणी होते. या पाण्यात एका तरुण दाम्पत्याने पोटच्या बाळाला उचलून धरत असा मार्ग काढला. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि अनेकांना आधुनिक युगात श्रीकृष्ण काळातील ‘वासुदेव’ आठवले. नागरिकांनी स्थानिक प्रशासनावर याबद्दल टीका केली आहे.
वाहतूक विस्कळीतमध्य प्रदेशातील ९ जिल्ह्यांत दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तराखंडमध्ये डेहराडून-बागेश्वर भागांत रविवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे ६४ रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बिहारमध्ये दिवसभर पाऊसराज्यात रविवारी दिवसभर १६ जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू होती. सायंकाळपर्यंत अनेक भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. पाटण्यात दिवसभराच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
प. बंगालमध्ये नद्यांना पूरराज्यात तिस्ता आणि जलढाकासह इतर नद्यांना पूर आला असून, यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. राज्याच्या उत्तरेत पावसाचा अधिक परिणाम झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार दुपारपर्यंत या भागात दमदार पावसाची शक्यता आहे.
अंगणात नव्हे तर घरातच आलेल्या गंगेचे पूजनप्रयागराजमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी सखल भागात साचले आहे. दारागंज येथे राहणारे उपनिरीक्षक चंद्रदीप निषाद पाण्याखाली गेलेल्या त्यांच्या घराच्या दारातच गंगा पूजन करताना दिसत आहेत.गणवेशातील अधिकारी गंगेला आधी फुले वाहतात आणि नंतर दूध अर्पण करतात. ते म्हणतात, “जय गंगा मैया! तुम्ही माझ्या दाराशी आलात यासारखे भाग्य कोणते.” उत्तर भारतात गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने, अनेक गावे बाधित झाली आहेत.