२०२४ लोकसभा निवडणुकीत सपा उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा जिंकेल - अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:25 IST2023-06-11T16:25:18+5:302023-06-11T16:25:51+5:30
देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.

२०२४ लोकसभा निवडणुकीत सपा उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागा जिंकेल - अखिलेश यादव
सितापूर : देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. देशातील सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून निघतो त्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक मोठा दावा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टी ८० पैकी ८० जागा जिंकेल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, एका प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी अखिलेश यादव सितापूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष सर्व ८० जागा काबीज करेल.
समाजवादी पार्टी लोकसभा चुनाव में 80 की 80 सीटों पर अपनी जीत दर्ज करेगी: समाजवादी पार्टी के प्रमुख अखिलेश यादव, सीतापुर (10.06) pic.twitter.com/axxXgf6rxC
— ANI_HindiNews (@AHindinews) June 11, 2023
भाजपवर टीका
"सत्ताधारी भाजपने नवा मार्ग अवलंबला आहे. भाजप आता सॉफ्ट हिंदुत्वाविषयी बोलत आहे. पण आम्ही आधीच मवाळ आहोत, पण आता कठोर होण्याची वेळ आली आहे", असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय अखिलेश यादव यांनी जात जनगणनेवरूनही सरकारवर निशाणा साधला. जात जनगणनेतूनच सामाजिक न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांवर खोटे बोलल्याचा आरोप
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की आज राज्यात १०० पैकी फक्त ४ जण बेरोजगार आहेत. राज्यातील नेत्यांबरोबरच अधिकाऱ्यांनी देखील खोटे बोलण्याची मालिका लावली आहे.