दारुच्या नशेत पतीनं घरात चिकन आणलं; दुखावलेल्या पत्नीनं आयुष्य संपवलं; शेवट भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:51 IST2025-09-12T12:49:14+5:302025-09-12T12:51:41+5:30
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील वंशीवाला गावात धक्कादायक घटना घडली.

दारुच्या नशेत पतीनं घरात चिकन आणलं; दुखावलेल्या पत्नीनं आयुष्य संपवलं; शेवट भयंकर!
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील वंशीवाला गावात धक्कादायक घटना घडली. पतीने दारुच्या नशेत घरात चिकन आणले म्हणून दुखावलेल्या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. घटना लपवण्यासाठी पतीने तिचा मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिला आणि ती बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. परंतु, मृत महिलेच्या नातेवाईकांना पतीच्या भूमिकेबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून मृत महिलेच्या पतीसह त्याच्या दोन भावांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रीना सिंग (वय, २१) असे मृत महिलेचे नाव आहे. आदमपूरमधील कोकापूर गावातील रहिवासी असलेल्या रीनाने दहा महिन्यांपूर्वी निगम सिंगशी लग्न केले. रीना शाकाहारी होती. मात्र, असे असतानाही निगम हा दारूच्या नशेत घरी चिकन घेऊन आला. त्यामुळे दुखावलेल्या रीनाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटना लपवण्यासाठी निगम सिंगने त्याचा भाऊ महकर आणि चुलत भाऊ बिजेंद्र सिंग यांच्या मदतीने रीनाचा मृतदेह एका कपड्यात गुंडाळून घरापासून सुमारे ३ किमी अंतरावर नदीत फेकून दिला. त्यानंतर त्याने स्थानिक पोलीस ठाण्यात रीना बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
रीना बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून निगमच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. तसेच रीनाच्या सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी निगमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबूल केले की, रीनाचा आक्षेप असतानाही तो चिकन घेऊन घरी आला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात रीनाने गळफास लावून आत्महत्या केली. रीनाच्या मृत्युचे खापर आपल्या डोक्यावर फोडले जाऊ नये, म्हणून त्याने मृतदेह नदीत फेकून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी निगमसह त्याच्या दोन्ही भावांना अटक करण्यात आली. तसेच आत्महत्येसाठी रीनाने वापरलेली ओढणी देखील जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.