५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 23:06 IST2025-08-29T23:05:09+5:302025-08-29T23:06:09+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन केले.

CM Yogi Adityanath lays foundation stone for new office of Uttar Pradesh Election Commission! | ५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!

५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) अवध विहार योजनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी 'उत्तर प्रदेशमुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे', असे महत्त्वपूर्ण विधान केले. ५० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चातून उभारली जाणारी ही इमारत लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर, राज्य निवडणूक आयुक्त राजन प्रताप सिंह, यूपी महिला आयोगाच्या अध्यक्षा, एससी-एसटी आयोगाच्या अध्यक्षा, पंचायती राज्य आयोगाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जनताच आमच्यासाठी 'जनार्दन'!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "जनता ही केवळ मतदार नसून आमच्यासाठी 'जनार्दन' अर्थात ईश्वर आहे." ते म्हणाले की, जर कोणताही लोकप्रतिनिधी जनतेच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करत असेल, तर जनता पाच वर्षांनंतर त्याला नाकारते. हीच लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे आणि या व्यवस्थेनेच भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले आहे.

उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रक्रिया जगात सर्वात मोठी!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रियेची विशालता अधोरेखित केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात केवळ त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेत १२ कोटींहून अधिक मतदार मतदान करतात, जी जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. राज्यात ५७,६०० ग्रामपंचायती, ८२६ क्षेत्र पंचायती आणि ७५ जिल्हा पंचायती आहेत. याशिवाय, १७ महानगरपालिका, १९९ नगरपालिका आणि ५४४ नगरपंचायतींसह १४,००० हून अधिक नगरसेवकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे.

आतापर्यंत निवडणूक आयोगाचे कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते, परंतु आता अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वतःची इमारत मिळाल्याने आयोगाच्या कामकाजाला गती मिळेल, असे योगी म्हणाले. सुमारे २,६१८ चौरस मीटर जागेवर सहा मजली इमारत १८ महिन्यांत पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले.

२०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित भारत २०४७'च्या ध्येयावरही भर दिला. ते म्हणाले, "विकसित उत्तर प्रदेशशिवाय 'विकसित भारत'चे स्वप्न अपूर्ण राहील. या दिशेने, निवडणूक आयोगासारख्या लोकशाही संस्था मजबूत असणे ही सर्वात मोठी हमी आहे", असे त्यांनी सांगितले.

नवीन इमारतीतील अत्याधुनिक सुविधा
या नवीन इमारतीमध्ये रोड पाथवे, ओपन पार्किंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP) यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणाली, दोन १३-व्यक्ती क्षमतेच्या लिफ्ट आणि एक ८-व्यक्ती क्षमतेची लिफ्ट, तसेच आधुनिक विद्युतीकरण व्यवस्थाही असणार आहे. हे कार्यालय एक आदर्श कार्यालय म्हणून उदयास येईल, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Web Title: CM Yogi Adityanath lays foundation stone for new office of Uttar Pradesh Election Commission!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.