'विकसित उत्तर प्रदेश २०४७' मोहिमेत लोकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा; CM योगी आदित्यनाथ यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:15 IST2025-09-04T17:14:32+5:302025-09-04T17:15:22+5:30
हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

'विकसित उत्तर प्रदेश २०४७' मोहिमेत लोकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा; CM योगी आदित्यनाथ यांचं आवाहन
लखनौ - २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्याच्या दृष्टीने "समर्थ उत्तर प्रदेश, विकसित उत्तर प्रदेश २०४७" या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांना त्यांची मते आणि सूचना सरकारपर्यंत पोहचवता येणार आहेत. पुढील महिनाभर चालणाऱ्या या महाअभियानासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौच्या लोक भवन येथे विशेष QR कोड आणि ऑनलाइन पोर्टलचं उद्घाटन केले. यातून लोक त्यांच्या सूचना मांडू शकतात. या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या सूचना मांडाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
QR कोड आणि ऑनलाइन पोर्टल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात म्हणाले की, सूचना देण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज येथे हे QR कोड लावण्यात येतील. लोकांनी या कोडवर स्कॅन करून त्यांच्या सूचना थेट पोर्टलवर मांडू शकतात. सोबतच विकसित ऑनलाइन पोर्टल https://samarthuttarpradesh.up.gov.in या माध्यमातून लोक त्यांची मते आणि प्रस्तावही सादर करू शकतील असं त्यांनी सांगितले.
चांगल्या सूचनेला मिळणार पुरस्कार
त्याशिवाय विकसित उत्तर प्रदेशासाठी प्राप्त होणाऱ्या चांगल्या आणि उपयुक्त सूचनांची निवड तज्ज्ञ आणि निती आयोग करेल. निवड झालेल्या चांगल्या सूचनांना राज्यस्तरीय पुरस्कार सरकारकडून दिला जाईल. हे पाऊल केवळ सूचना मिळवण्यासाठी नाही तर लोकांनाही राज्याच्या उभारणीत योगदान देऊन विकसित राज्याचे ध्येय निश्चित करण्यासाठी आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
दरम्यान, या कार्यक्रमाला ४०० हून अधिक तज्ज्ञमंडळी उपस्थित होते, ज्यांनी मोहिमेच्या कृती आराखड्यावर आणि लोकसहभागाचे महत्त्व यावर चर्चा केली. हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.