मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:50 IST2025-08-26T12:49:09+5:302025-08-26T12:50:25+5:30

देशाचे सुपुत्र, अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवाद साधला.

Chief Minister Yogi Adityanath announced a scholarship in the name of Group Captain Shubhanshu Shukla | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा

चार दशकांनंतर एका भारतीयाला अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळाली. लखनौमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला यांना ही संधी मिळाली. यशस्वी प्रवासानंतर ते पहिल्यांदाच लखनौला आले. त्यांचा अंतराळ प्रवास आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतीय त्यांच्या अंतराळ प्रवासाकडे मोठ्या आशेने पाहत होता. देशाचे सुपुत्र, अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवाद साधला. 

ब्रजेश पाठक यांनी शुभांशू शुक्ला यांच्या आई आशा शुक्ला यांचा, केशव प्रसाद मौर्य यांनी वडील शंभू दयाल शुक्ला यांचा आणि महापौर सुषमा खरकवाल यांनी कामना शुक्ला यांचा सन्मान केला. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं. याच दरम्यान माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून शुभांशू यांच्या अंतराळ प्रवासावर आधारित एक लघुपट देखील दाखवण्यात आला.

शिष्यवृत्तीची केली घोषणा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अनुभवाचा वापर विभागात करण्यास सांगितलं. याशिवाय योगींनी स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभांशू शुक्ला यांच्या नावाने शिष्यवृत्तीची मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, "३ ते ४ वर्षांपूर्वी राज्यातील कोणत्याही विद्यापीठात किंवा संस्थेत स्पेस टेक्नॉलॉजीबाबत कोणताही अभ्यासक्रम नव्हता, पदवी नव्हती. सध्या राज्यातील अनेक टेक्निकल इन्स्टीट्यूशनमध्ये स्पेस टेक्नोलॉजीचे कोर्सेस आहेत."  

२०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं लक्ष्य

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं लक्ष्य दिलं आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी, आपल्याला विकासाच्या त्या सर्व क्षेत्रांसाठी आपले दरवाजे उघडे ठेवावे लागतील जिथे प्रगतीची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांचे वडील राज्य सरकारच्या सचिवालय प्रशासनात अधिकारी होते. त्यांच्या गौरवशाली मार्गावर चालणाऱ्या त्यांच्या मुलाचा केवळ उत्तर प्रदेशलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासात त्यांनी ३२० वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली. यावरून त्यांच्या प्रवासाचे महत्त्व आणि उद्देश स्पष्ट होतो." 

१८ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा प्रवास 

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्याशी अंतराळ प्रवासाबाबत चर्चा झाली, ज्यामध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा प्रवास, अंतराळ मोहीम आणि भविष्यातील प्रयोगांवर चर्चा झाली. शुक्ला यांनी १८ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा प्रवास केला, जो कोणत्याही सामान्य नागरिकासाठी एक अविश्वसनीय अनुभव आहे. त्यांचा अनुभव भविष्यात उत्तर प्रदेश आणि देशातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल. या प्रवासातून त्यांनी केवळ अंतराळात आपला ठसा उमटवला नाही तर नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, पूर, दुष्काळ आणि कृषी संकटांना तोंड देण्यासाठी एक नवीन दिशा दाखवली. 

शरीरात होतात अनेक बदल 

शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात घालवलेले काही क्षण शेअर केले. त्यांनी सांगितलं की, "जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच अंतराळ स्थानकावर पोहोचता तेव्हा तुमचं शरीर पहिल्यांदाच मायक्रोग्रॅव्हिटीचा अनुभव शेअर करतं. तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. तुमच्या शरीरातील सर्व रक्त डोक्यात येतं, ज्यामुळे तुमचं डोकं मोठं होतं. तुमचं हृदय मंदावतं. तुमच्या पोटात जे काही आहे ते देखील तरंगू लागतं. तुमच्या आत काय चाललं आहे ते तुम्हाला समजत नाही. तुम्हाला भूक लागत नाही. अनेक आव्हानं आहेत. भारत या दिशेने प्रवास करत आहे. मागे बसलेल्या मुलांना माझा मेसज आहे की २०४० पर्यंत तुमच्यापैकी एक जण नक्कीच चंद्रावर जाईल. मीही या स्पर्धेत त्यांच्यासोबत असेन."

Web Title: Chief Minister Yogi Adityanath announced a scholarship in the name of Group Captain Shubhanshu Shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.