CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:25 IST2025-09-26T12:24:24+5:302025-09-26T12:25:29+5:30
PM Modi In UPITS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी एक जिल्हा एक उत्पादन योजनेबद्दलही भाष्य केले.

CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
"हा भव्य सोहळा राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे. गुंतवणूकदार, व्यापारी आणि उद्योजकांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करावी. त्यांच्यासाठी चांगली संधी आहे", असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे (UPITS)उद्घाटन करताना केले. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या कामाचेही कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश वेगाने विकास करत आहे. उत्तर प्रदेश फक्त कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांमध्येच अग्रेसर नाही, तर उत्पादन निर्मिती, पर्यटन आणि संरक्षण क्षेत्रातही 'आत्मनिर्भर भारताचा एक मजबूत स्तंभ बनला आहे."
या व्यापार मेळाव्यामध्ये आलेल्या १५० देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांच्या सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे आणि सर्व गुंतवणुकदारांचे या आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
मोदी म्हणाले, 'उत्तर प्रदेशात दळणवळणाची क्रांती झाली'
पंतप्रधान मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त 'अंत्योदय'च्या सिद्धांताची आठवण करत उत्तर प्रदेशचे विकास मॉडेल हे त्याचे जिवंत उदाहरण आहे, असे सांगितले. मोदी म्हणाले की, "अंत्योदयचा अर्थ गरिबांपर्यंत विकास पोहोचवणे आहे आणि उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न याच दिशेने आहेत. गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेशात कनेक्टिव्हिटीमध्ये जी क्रांती झाली आहे, त्यामुळे वाहतुकीचा खर्च खूप कमी झाला आहे."
"उत्तर प्रदेश देशात सर्वाधिक एक्सप्रेसवे असलेले राज्य बनले आहे आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य आहे. हे दोन सर्वात मोठ्या डेडीकेटेड कॉरिडॉरचा भाग आहे. हेरिटेज टूरिझममध्येही ते नंबर वन आहे. 'नमामि गंगे' सारख्या अभियानांने उत्तर प्रदेशला क्रूझ टूरिझमच्या नकाशावर मजबूत स्थान दिले आहे", असेही मोदी यावेळी म्हणाले.
वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टचे मोदींनी केले कौतुक
पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' (ODOP) योजनेची स्तुती केली. ते म्हणाले की, " वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमुळे जिल्ह्यांतील उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली आहेत. मला जेव्हा परदेशी पाहुण्यांना भेटायचे असते, तेव्हा त्यांना काय द्यायचे याचा जास्त विचार करावा लागत नाही."
"आमच्या टीमकडे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टचा कॅटलॉग आहे. उत्तर प्रदेश आता उत्पादनांचे जागतिक केंद्र बनत आहे. जगातील सर्वात मोठे रेकॉर्ड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर भारत आहे आणि यात उत्तर प्रदेशची भूमिका खूप मोठी आहे. आज भारतात जेवढे मोबाईल फोन बनतात, त्यापैकी ५५ टक्के उत्तर प्रदेशात तयार होतात", असे मोदींनी यावेळी सांगिले.
स्वदेशी निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश महत्त्वाचा -मोदी
"आत्मनिर्भर भारत अभियानाच्या संदर्भात पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील सेमीकंडक्टर आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीबद्दलही माहिती दिली. मोदी म्हणाले की, "सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारताची आत्मनिर्भरता वाढेल. येथून काही किलोमीटर दूर एका मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. आपल्या सैन्यांना स्वदेशी उत्पादने हवी आहेत, इतरांवरील अवलंबित्व कमी करायचे आहे."
"भारतात एक व्हायब्रंट डिफेन्स सेक्टर विकसित करायचे आहे. उत्तर प्रदेश यात मोठी भूमिका बजावत आहे. लवकरच रशियाच्या सहकार्याने बनलेल्या कारखान्यात एके-२०३ रायफल्सचे उत्पादन सुरू होणार आहे. डिफेन्स कॉरिडॉरची निर्मितीही झाली आहे, येथे शस्त्रे आणि दारूगोळ्याचे उत्पादनही सुरू होत आहे", असेही मोदी म्हणाले.
गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे राहणार
"उत्तर प्रदेशात गुंतवणूक करा. येथील सिंगल विंडो सिस्टम मजबूत झाली आहे आणि ती सातत्याने वाढत आहे. तुम्ही त्याचा उपयोग करा आणि एक कंप्लीट प्रॉडक्ट येथेच बनवा. यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार तुमच्यासोबत आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणे म्हणजे भारतात गुंतवणूक करणे आहे. ही तुमच्यासाठी 'विन-विन सिच्युएशन' आहे", असे आवाहन मोदींनी केले.