Image of Sharad Pawar grafted by six hundred kilograms of seed on an area of 4.5 acres | साडेचार एकर क्षेत्रावर सहाशे किलो बियाण्याद्वारे साकारली शरद पवार यांची प्रतिमा
साडेचार एकर क्षेत्रावर सहाशे किलो बियाण्याद्वारे साकारली शरद पवार यांची प्रतिमा

- बालाजी आडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद) : विस्तीर्ण असं साडे चार एकर क्षेत्र...यात पंधरा दिवसाची पेरणीपूर्व मशागत करून त्यावर केलेलं आखीव-रेखीव रेखांकन... यात आठ दिवसापूर्वी विविध बियाणांची केलेली पेरणी...हे बीज अंकुरलं अन् साकार झाली तब्बल १ लाख ८० हजार स्क्वेअर फूट आकाराची शरद पवार यांची प्रतिमा. अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

गत पाच दशकं गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय सारीपाटावरील एक महत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार यांना गणलंं जातं. त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य चाहते राज्यभर आहेत. मात्र निपाणी (ता.कळंब) येथील भूमिपूत्र व राज्यभर एक अष्टपैलू आर्टीस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मंगेश अनिरुद्ध निपाणीकर या कलाप्रेमीने  अफलातून कलाकृती सादर करत पवारांना आगळ्याावेगळ्या शुुभेच्छा दिल्याा आहेत. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. ऐंशी वर्षाचे शरद पवार मराठी मुलूखातील एक ज्येष्ठ नेते असले तरी आजही ते असंख्य तरूणाईसाठी एका दिपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहेत. गुरूवारी राज्यभर पवार यांचा वाढदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.

मात्र पवारांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेल्या मंगेश निपाणीकर या तरूण कलाकाराने यंदाचा शरद पवार यांचा वाढदिवस आपल्या कलाकृतीद्वॉरे ‘स्पेशल’ करण्याचा संकल्प केला होता. यासाठी त्यांनी ‘ग्रास पेटींग’ या कला माध्यमांची निवड केली. फक्त यावेळी तृणाऐवजी तरकारी व खाद्यान्न प्रवगार्तील बियाण्यांचा वापर करत अंकुरलेल्या बिंजाकुराच्या माध्यमातून पवार ‘साहेब’ साकारण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी गावातील सुरेश पाटील व बाळासाहेब पाटील या बंधूच्या निपाणी-नायगाव रस्त्यावरील क्षेत्राची निवड केली. जवळपास साडेचार एकर क्षेत्राची पंधरा दिवस पेरणीपूर्व मशागत केली. यानंतर या जमिनीवर शरद पवार यांची प्रतिमा साकार करण्यासाठी तंतोतंत रेखांकन करण्यात आले. हे रेखांकन ग्राफिक्स डिझाईनवर बेतलेलं होतं. यासाठी विविध आकारमानं परिणामकारकरित्या मांडण्यात आली. आणि ४ डिसेंबरला यामध्ये कल्पकरित्या बियाणं पेरण्यात आलं. चांगली उगवणक्षमता होण्याकरीता ओलाव्याची काळजी घेतली. याकरीता आवश्यक त्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. गुरुवारी केलेल्या कष्टाला यश आले. अखेर सकाळपासून अंकूर फुटण्यास सुरूवात झाली. पुरेसे बिंजाकूर दृष्टीपथात आल्यानंतर आकाशातून यावर नजर टाकली असता साकार झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिमा.

 
६०० किलो बियाण्यांचा वापर.....

मंगेश निपाणीकर यांनी या कलाकृतीसाठी एकूण पाच प्रकारच्या वाणांच्या ६०० किलो बियाण्यांचा वापर केला आहे. यात २०० किलो अळीव, ३०० किलो मेथी, ४० किलो गहू, ४० किलो ज्वारी व २० किलो हरभरा असा वापर करण्यात आला आहे.

१ लाख ८० स्क्वेअर फुटाची भव्य प्रतिमा...
मंगशे निपाणीकर यांनी  ‘ग्रास पेटींग’ कलाप्रकारातून गतवर्षी देशातील पहिली अशी निलंगा (जि. लातूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेसहा एकर क्षेत्रावर, अडीच लाख स्क्वेअर फूट आकाराची भव्य प्रतिमा साकारली होती. यानंतर उपरोक्त कलाप्रकारात त्यांची निपाणी येथे १ लाख ८० स्क्वेअर फूट आकाराची साकार केलेली शरद पवार यांची ही दुसरी विक्रमी कलाकृती आहे. गत पंधरा दिवसांपासून घेतलेल्या अथक परिश्रमाला अगदी ‘१२/१२’ ची योग्य टायमींग साधण्याची कसरत करावी लागली. यास गुरूवारी दुपारनंतर यश आले. ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 
शेतक-यांच्या पिकाद्वारे शुभेच्छा
यासंदर्भात मंगेश निपाणीकर यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांचे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मोठं योगदान आहे. देशाचे दहा वर्ष कृषि मंत्री असलेल्या अशा नेत्यांस एक शेतकरी पूत्र म्हणून मी शेती पिकांतून प्रतिमा साकारून शुभेच्छा दिल्या आहेत, असे ‘लोकमत’शी बोलतांना ते म्हणाले.

Web Title: Image of Sharad Pawar grafted by six hundred kilograms of seed on an area of 4.5 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.