खरंच !! आनंद बरणीत भरून, साठवून ठेवता येतो ! पटकन आणा तुमची बरणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 06:46 PM2020-04-10T18:46:41+5:302020-04-10T18:48:38+5:30

घरचे तुम्हाला पिसाळून सोडतायत ना, चला, आज बनवा आनंदाची बरणी!

DIY : lock down time - make your special momory jar, happy jar for good things. | खरंच !! आनंद बरणीत भरून, साठवून ठेवता येतो ! पटकन आणा तुमची बरणी 

खरंच !! आनंद बरणीत भरून, साठवून ठेवता येतो ! पटकन आणा तुमची बरणी 

Next
ठळक मुद्देकाही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला. 

- गौरी पटवर्धन 


सध्याचा सगळ्यात मोठा वैताग काय आहे? तर काहीच आपल्या मनासारखं होत नाहीये. काहीच चांगलं होत नाहीये. बाहेर जाता येत नाही. मित्रंना घरी बोलवू शकत नाही. हवं ते खाता येत नाही. आईवडील सारखे घरात असतात त्यामुळे त्यांचं सारखं आपल्यावर लक्ष असतं आणि ते सारख्या आपल्याला सूचना देऊन पिसाळून सोडतायत. कधीही बोअर होतंय म्हंटलं की   ‘‘अभ्यास कर / पुस्तकं वाच / आधी तो फोन खाली ठेव’’ असलं काहीतरी सांगतायत. किंवा  ‘आमच्या लहानपणी’ ची कॅसेट वाजवतायत. आजीआजोबांना बाहेर फिरता येत नाही म्हणून ते चिडचिडे झालेत आणि सगळ्यांना राग काढायला आपण एकटेच सापडतोय!
पण हे सगळं आपल्याला वाटतंय तितकं खरंच वाईट आहे का? का यातपण थोडं थोडं चांगलं काहीतरी होतंय आणि आपण त्याच्याकडे बघत नाही आहोत? ते ठरवायचं कसं? तर हॅपिनेस जार मधून! म्हणजे अक्षरश: आनंदाची बरणी!
काय करायचं, तर आईकडून एक छोटी बरणी मिळवायची. ती तुम्हाला कोणीच काचेची देणार नाही त्यामुळे ती प्लॅस्टिकची पण चालेल. त्याच्या झाकणाला एक छोटी फट तयार करायची. पिगी बँकला असते तशी. मग घरातले सगळे रंगीत कागद गोळा करायचे. घरात रंगीत कागद नसतील तर वॉटर कलर्सनी रंग देऊन, त्यावर डिझाईन काढून आपण ते कागद तयार करायचे. आणि मग, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते एका चिट्ठीवर लिहायचं. त्याची घडी करायची आणि त्या बरणीत टाकून द्यायची.


या चिठ्ठयांमध्ये काय काय असू शकेल?
 तर 
1. बाल्कनीत ठेवलेल्या पाण्यात चिमण्या येऊन अंघोळ करून गेल्या.
2. रस्त्यावर राहणा?्या कुत्र्याला पोळी घातल्यामुळे त्याची तुमची दोस्ती झाली.
3. आज छान चित्र काढता आलं.
4. आज मी पहिल्यांदाच पोळी केली.
असलं काहीही छान घडलेलं तुम्ही त्या चिट्ठीवर लिहू शकता. आता या बरणीचं काय करायचं? तर ती सांभाळून ठेवायची. तिच्याकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला सगळंच काही वाईट घडत नाहीये. काही चांगल्या गोष्टी पण घडतायत. बरेचदा आपल्याला तेवढी आठवणही पुरेशी असते मूड चांगला व्हायला. 

 

Web Title: DIY : lock down time - make your special momory jar, happy jar for good things.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.