Travel : 'या' देशात मुस्लिम बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:37 IST2025-12-26T11:35:50+5:302025-12-26T11:37:08+5:30
तुम्हाला माहित आहे का? जगात असा एक देश आहे जिथे भारतीय रुपया तुम्हाला अक्षरश: 'करोडपती' बनवू शकतो.

Travel : 'या' देशात मुस्लिम बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
परदेशात फिरायला जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते, पण खिशाचा विचार केला की अनेकजण पाऊल मागे घेतात. डॉलर किंवा पाउंडसमोर भारतीय रुपया कमकुवत असल्याने परदेशवारी महाग वाटते. पण तुम्हाला माहित आहे का? जगात असा एक देश आहे जिथे भारतीय रुपया तुम्हाला अक्षरश: 'करोडपती' बनवू शकतो. हा देश दुसरा तिसरा कोणी नसून सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला इंडोनेशिया आहे.
१ लाखाचे होतील पावणेदोन कोटी!
इंडोनेशिया हे पर्यटनाचे मोठे केंद्र आहे. येथील चलनाचे नाव 'इंडोनेशियन रुपिया' (IDR) असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारतीय रुपयाच्या तुलनेत तिथले चलन खूपच स्वस्त आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार, भारताचा १ रुपया म्हणजे इंडोनेशियाचे साधारण १८६ रुपिया होतात. या हिशोबाने जर तुम्ही भारतातून १ लाख रुपये घेऊन इंडोनेशियाला गेलात, तर तिथे गेल्यावर तुमच्याकडे सुमारे १ कोटी ८५ लाखांहून अधिक इंडोनेशियन रुपिया असतील. यामुळेच भारतीयांसाठी हा देश बजेट ट्रिपसाठी सर्वात उत्तम पर्याय ठरतो.
मुस्लिम देश असूनही नोटेवर गणपती!
इंडोनेशियाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. मात्र, तरीही या देशाच्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा खोलवर प्रभाव दिसून येतो. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इंडोनेशियाच्या २० हजारच्या नोटेवर असलेले 'भगवान श्रीगणेशाचे' चित्र! बाप्पाला तिथे बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. एका मुस्लिम देशाच्या चलनी नोटेवर हिंदू देवतेचा फोटो असणे, हे जागतिक स्तरावर धार्मिक सहिष्णुतेचे मोठे उदाहरण मानले जाते.
रामायण-महाभारताची परंपरा आजही जिवंत
इंडोनेशियात केवळ नोटांवरच नाही, तर तिथल्या मातीतही भारतीय संस्कृती रुजलेली आहे. तिथे आजही रामायण आणि महाभारतातील कथांवर आधारित नाटके, नृत्ये मोठ्या उत्साहात सादर केली जातात. भगवान राम आणि कृष्ण यांच्याबद्दल तिथे प्रचंड आदर आहे. तेथील वास्तुकला आणि लोककलेमध्ये हिंदू चिन्हांचा वापर सर्रास पाहायला मिळतो.
का करावी इंडोनेशियाची सफर?
जर तुम्हाला कमी खर्चात आंतरराष्ट्रीय सहलीचा आनंद घ्यायचा असेल, तर इंडोनेशिया हा रॉयल अनुभव देणारा देश आहे. येथील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक मंदिरे आणि भारतीय रुपयाची असलेली ताकद यामुळे तुम्ही तिथे एखाद्या करोडपतीसारखे राहू शकता. केवळ स्वस्त चलन म्हणूनच नाही, तर भारताशी असलेले सांस्कृतिक नाते अनुभवण्यासाठीही एकदा तरी या देशाला भेट द्यायला हवी.