Travel : गोव्याचे 'हे' ५ नाईट मार्केट्स एकदातरी बघायलाच हवे! शॉपिंग प्रेमी अन् पर्यटकांसाठी जणू स्वर्गच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:58 IST2026-01-10T14:57:48+5:302026-01-10T14:58:42+5:30
सूर्यास्तानंतर गोव्यातील काही खास बाजारपेठा अशा काही उजळून निघतात की, तिथे गेल्यावर तुम्हाला एका वेगळ्याच जगाचा अनुभव येतो.

Travel : गोव्याचे 'हे' ५ नाईट मार्केट्स एकदातरी बघायलाच हवे! शॉपिंग प्रेमी अन् पर्यटकांसाठी जणू स्वर्गच
गोव्याचे नाव काढले की डोळ्यासमोर येतात ते अथांग समुद्रकिनारे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि थिरकायला लावणारे संगीत. पण गोव्याची खरी मजा फक्त क्लब आणि पबपुरती मर्यादित नाही. सूर्यास्तानंतर गोव्यातील काही खास बाजारपेठा अशा काही उजळून निघतात की, तिथे गेल्यावर तुम्हाला एका वेगळ्याच जगाचा अनुभव येतो. तुम्ही जर शॉपिंगचे शौकीन असाल आणि पार्टीच्या गजबजाटापासून काहीतरी वेगळे शोधत असाल, तर गोव्यातील 'या' ५ प्रसिद्ध 'नाईट मार्केट्स'ला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.
१. अंजुना फ्ली मार्केट: बोहो फॅशनचा कट्टा
अंजुना येथील हे मार्केट त्याच्या 'बोहो फॅशन'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. रात्रीच्या वेळी येथील रोषणाई मनाला भुरळ घालते. इथे तुम्हाला चांदीचे दागिने, हाताने बनवलेल्या बॅग्स आणि घराच्या सजावटीच्या अत्यंत सुंदर वस्तू मिळतील. खरेदीसोबतच इथे लाईव्ह म्युझिक, टॅरो कार्ड रीडिंग आणि बीचवरील कॅफेमध्ये बसून तुम्ही रात्रीचा आनंद घेऊ शकता.
२. शनिवार नाईट मार्केट, अरपोरा: खादाडी अन् धमाल
जर तुम्हाला एखाद्या उत्सवासारखा माहोल हवा असेल, तर अरपोराचे शनिवारचे नाईट मार्केट तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे मार्केट विशेषतः आंतरराष्ट्रीय फूड स्टॉल्ससाठी ओळखले जाते. इथे सुशीपासून ते सीफूड आणि गॉरमेट बर्गरपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. खादाडीसोबतच डिझायनर कपडे, आर्ट वर्क आणि लाईव्ह बँड्सच्या गाण्यांवर तुम्ही थिरकू शकता.
३. मिकी नाईट बाजार: रिलॅक्स शॉपिंगसाठी उत्तम
बागा बीचजवळ असलेले हे मार्केट त्यांच्यासाठी आहे ज्यांना शांततेत शॉपिंग करायला आवडते. इथला माहोल अतिशय व्हायब्रंट पण तरीही रिलॅक्स असतो. खरेदी करून थकल्यावर तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून स्थानिक बँड्सच्या लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेत जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
४. अरामबोल फ्ली मार्केट: हिप्पी संस्कृतीची झलक
उत्तर गोव्यातील अरामबोल बीचवर भरणारे हे मार्केट 'हिप्पी-थीम'साठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला इको-फ्रेंडली उत्पादने, हाताने बनवलेले दागिने आणि स्पिरिच्युअल आर्टशी संबंधित वस्तू सहज मिळतील. विशेष म्हणजे इथे मिळणारे सेंद्रिय आणि व्हीगन फूड पर्यटकांच्या पसंतीस उतरते. रात्रीच्या वेळी इथले फायर शो पाहण्यासारखे असतात.
५. कळंगुट मार्केट स्क्वेअर: खरेदीदारांसाठी नंदनवन
हे गोव्यातील सर्वात लोकप्रिय मार्केट मानले जाते. तिबेटी हस्तकला, चामड्याच्या वस्तू, मसाले आणि रंगीबेरंगी कपड्यांसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही दुकानदारांशी मनसोक्त बार्गेनिंग करू शकता. संध्याकाळी इथे मोठी गर्दी असते, पण इथली ऊर्जा तुम्हाला थकवा जाणवू देणार नाही.