(Image Credit : India Untravelled)
उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं. कारण इथे अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यासोबतच उत्तराखंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही जगभरात लोकप्रिय आहे. उत्तराखंडमधील लोकप्रिय डेस्टिनेशन्स जसे की, ऑली, चकराता, मसूरी आणि देहरादून सर्वांनाच माहीत आहेत. मात्र इथे अशीही काही ठिकाणे आहेत, ज्यांबाबत फार लोकांना माहीत नाही. असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे पेओरा.
पेओरा हे हिल्स स्टेशन नैनीताल आणि अल्मोडा दरम्यान येतं. हे हिमालयाच्या उंचच उंच डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलं गेलेलं एक गाव आहे. इथे निसर्गाने केलेली सुंदरतेची बरसात आणि सनसेट बघण्यासारखा असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी सजलेलं हे गाव तुम्हाला स्वर्गाचा आनंद देऊ शकतं. पेओरा मुक्तेश्वरपासून ८ किमी अंतरावर आहे.
उत्तराखंडमधील फळांची टोपली पेओरा
पेओरा हे गाव वेगवेगळ्या फळांसाठी फार लोकप्रिय आहे. लोक येथील ताजी फळे खाण्यासाठी आवर्जून येतात. तसेच येथील अनेक हर्बल प्रॉडक्टसही प्रसिद्ध आहेत. इथे कोणतही लोकल मार्केट नाही किंवा शॉपिंग सेंटर नाही. पण हर्बल प्रॉडक्ट तुम्ही लोकल फॅक्टरीमधून खरेदी करू शकता.
कधी जाणे योग्य?
पेओराला फिरायला जाण्यासाठी सर्वात चांगला कालावधी मार्च, मे, जून, सप्टेंबर आणि नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर मानला जातो. जानेवारी ते फेब्रुवारी इथे कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी होत असते. इथे जाण्यासाठी रस्तेही राहत नाहीत. पेओरापासून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन काठगोदाम हे आहे. हे येथून ७८ किमी अंतरावर आहे.
हे ध्यानात ठेवा
पेओरामध्ये कोणतही मार्केट नसल्याकारणाने बरं होईल की, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इतर काही आवश्यक वस्तू सोबत घेऊन जावे. इथे राहण्यासाठी तुम्हाला स्वस्तात घर मिळू शकतं.