राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 17:30 IST2019-05-09T17:22:03+5:302019-05-09T17:30:21+5:30
१९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते.

राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!
(Image Credit : cruisemapper.com)
दिल्लीमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टिका केली. पंतप्रधान म्हणाले की, राजीव गांधी हे INS Virat ही युद्धनौका घेऊन फिरायला गेले होते. INS Virat चा राजीव गांधी हे खाजगी वाहनासारखा वापर करत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर राजीव गांधी कुठे फिरायला गेले होते, त्या ठिकाणाचीही चर्चा सुरू झाली आहे.
ते १९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपानंतर या द्वीपाची चर्चा रंगली आहे.
काय आहे त्या द्वीपाचं नाव?
ज्या जागेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत, त्या ठिकाणाचं नाव आहे बंगाराम(Bangaram) आणि हा द्वीप केंद्र शासित प्रदेश लक्ष्यद्वीपचा भाग आहे. या द्वीपचं एकूण क्षेत्रफळ साधारण ०.६२३ स्क्वेअर किलोमीटर आहे. या द्वीपाच्या मधोमध एक खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूंनी नारळाची झाडे आहेत.
बंगाराम व्दीपवर टूरिज्म
बंगाराम द्वीपवर १९७४ मध्ये टूरिज्मला सुरूवात झाली. तेव्हा तिथे आयलॅंड बीच रिसॉर्टची सुरूवात झाली होती. त्यावेळी इथे पोहेचणे फार कठीण होते. कारण कमर्शिअल फ्लाइट इथपर्यंत येत नव्हती. नंतर जेव्हा कोच्चि ते अगत्तीपर्यंत विमान सेवा सुरू झाली तेव्हा बंगाराममध्ये पर्यटनाची दारे उघडी झाली. या रिसॉर्टमध्ये ६० कॉटेज आहेत. तशी तर लक्ष्यद्वीपमध्ये दारूबंदी आहे. पण या आयलॅंडवर तुम्ही मद्यसेवन करू शकता. हा द्वीप रातोरात चर्चेत तेव्हा आला, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटूंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत इथे सुट्टी घालवायला आले होते.
बंगाराममध्ये काय खास?
(Image Credit : TripAdvisor)
जर तुम्हाला बंगाराम द्वीपला फिरायला जायचं असेल तर आधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की, तिथे काय खास आहे. इथे तुम्हाला समुद्राचा सुंदर नजारा बघायला मिळेल आणि पाणीही भारतातील इतर समुद्र किनाऱ्यांपेक्षा अधिक स्वच्छ मिळेल. समुद्राच्या मधे दूरदूरपर्यंत पसरलेली वाळू, ताडाची झाडे, समुद्राचं गरम पाणी, मनमोहक वातावरण, सुंदर सूर्यास्त हे सगळं इथे अनुभवता येऊ शकतं. तसेच इथे जाऊन तुम्ही स्कूबा डायव्हिंग, डीप सी फिशिंगसारख्या अॅडव्हेंचरचा आनंदही घेऊ शकता.
कसे पोहोचाल?
बंगाराममध्ये सुट्टी घालवण्याचं मनात ठरवलं असेल तर आता हे जाणून घ्या की, इथे पोहोचाल कसे. येथील जवळचं एअरपोर्ट अगत्ती आहे. त्यासोबतच कोचीन आतंरराष्ट्रीय एअरपोर्टला उतरूनही तुम्ही इथे पोहोचू शकता. या दोन्ही ठिकाणांवर पोहोचण्यासाठी बंगळुरू, कोच्चि, चेन्नई व देशातील इतर विमान सेवा उपलब्ध आहेत.
कधी जाल?
इथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्गाचं सुंदर रूप बघू शकता. तसेच उन्हाळ्यात तुम्ही इथे मार्च ते मे महिन्यादरम्यान जाऊ शकता. या दिवसात इथे थोडी गरमी असते. पावसाळ्यात जून ते ऑगस्टमध्ये इथे जाल तर येथील हिरवळ आणि वातावरण पाहून तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. तसेच हिवाळ्यात तुम्ही इथे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात जाऊ शकता.
बंगारामला जाताना या गोष्टी ठेवा लक्षात
- बंगारामला जाताना परमिट घेणे विसरू नका. इथे जाण्यासाठी कोच्चिमध्ये ट्रॅव्हल एजन्टकडून तुम्ही परमिट घेऊ शकता.
- इथे जाताना सोबत कॅश घेऊन जावी लागेल, कारण इथे एटीएम नाहीत.
- इथे कॉटेजची संख्या कमी आहे. अशात जर इथे जाण्याचा प्लॅन असेल तर आधीच बुकिंग करून ठेवावं.
- जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर कोच्चिवरूनच स्नॅक्स घेऊन जा.
- इथे गेल्यावर तुम्हाला नेटवर्कची अडचण येऊ शकते. जर तुमच्याकडे बीएसएनएलचं मोबाइल कनेक्शन असेल तर अडचण कमी येईल.