कायमस्वरूपी रोजगाराच्या हमीसाठी राज्यभरातील युवक, युवतींचे ठाण्यात तीव्र आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:09 IST2025-10-19T12:09:46+5:302025-10-19T12:09:56+5:30
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थीं युवक, युवतींनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना राज्य शासन नोकरीत सामावून घेणार असल्याचे या आधी त्यांना आश्वासन मिळालेले असतानाही ते आजपर्यंत बेरोजगार आहेत.

कायमस्वरूपी रोजगाराच्या हमीसाठी राज्यभरातील युवक, युवतींचे ठाण्यात तीव्र आंदोलन
ठाणे : राज्य भरातील हजारो बेरोजगार युवक, युवतींनी आज मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडे कायमस्वरूपी रोजगाराच्या हमीची मागणी करत ठाण्यात संविधान चौक, कोर्ट नाका येथे 'काळी दिवाळी' आंदोलन सुरू केले आहे. या संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर, शासकीय विश्रामगृहासमोर सुरू झाले आहे. यामध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांतील हजारो बेरोजगार प्रशिक्षणार्थी युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थीं युवक, युवतींनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना राज्य शासन नोकरीत सामावून घेणार असल्याचे या आधी त्यांना आश्वासन मिळालेले असतानाही ते आजपर्यंत बेरोजगार आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये लोकशाहीच्या सहनशील मार्गाने आंदोलन छेडले आहे. मात्र त्यांची दखल न घेतल्याने राज्यभरातील हे प्रशिक्षण पूर्ण केलेले बेरोजगार दिवाळीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाच्या गावाला येऊन आज काळी दिवाळी साजरी करीत आंदोलन छेडत आहे, असे चाकुरकर यांनी सांगितले.
आजपासून सुरू असलेल्या या दिवाळीत राज्त्यांयभरातील या बेरोजगारांनी चला मामाच्या गावाला, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात ते एकत्र येत 'काळी दिवाळी' आंदोलन छेडत आहेत . या हजारो तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ह.भ.प. तुकाराम महाराज, विदर्भ प्रमुख अनुप चव्हाण, अमरावतीचे प्रकाश साबळे यांच्याकडून करण्यात येत आहे.
राज्य सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ही 'काळी दिवाळी' राज्यभर पसरवली जाईल असा इशाराही या वेळी आंदोलनकर्यांकडून देण्यात येत आहे. या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील 1,34,000 प्रशिक्षणार्थींना नियमित, कायमस्वरूपी रोजगाराची हमी देण्यात यावी. मानधनात त्वरित दुप्पट वाढ करण्यात यावी. वयोमर्यादा गणना प्रशिक्षण सुरू झालेल्या तारखेपासून करावी. रोजगार हमीच्या धर्तीवर कायदा लवकरात लवकर विधानसभेत पास करावा.
पार्श्वभूमी
- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकपूर्व घोषणेतून ‘लाडके भाऊ-बहिण’ योजना जाहीर करत दहा लाख तरुणांना प्रशिक्षण देऊन शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.
या योजनेत सहभागी झालेल्या 1.66 लाख प्रशिक्षणार्थींनी 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप शासकीय सेवेत समावेश किंवा त्यासमोरील दिशा स्पष्ट झालेली नाही.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, या प्रमाणपत्रांना कोणतीही शासकीय, खाजगी मान्यता नाही, त्यामुळे ते रोजगाराच्या दृष्टीने निरुपयोगी ठरत आहेत,
पूर्वी झालेली आंदोलने:
16 जानेवारी 2025 - आझाद मैदान, मुंबई मोर्चा
4 फेब्रुवारी 2025 - विराट मोर्चा
3 मार्च - 26 मार्च - 24 दिवस बेमुदत आमरण उपोषण
14 जुलै - छत्री मोर्चा (25,000 प्रशिक्षणार्थी)
1-5 ऑगस्ट - सांगली, आमरण उपोषण
25 ऑगस्ट - नागपूर संविधान चौक, चक्काजाम आंदोलन
19 सप्टेंबर - छत्रपती संभाजी नगर, बोंबाबोंब मोर्चा
राज्यभरातील 36 जिल्ह्यांत विविध आंदोलन
शासनाचे आश्वासन आणि त्यानंतरची स्थिती:
12 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील ठिय्या आंदोलनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक भेट देत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
मात्र, 14 ऑक्टोबरच्या कॅबिनेट बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे पुन्हा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.