खासगी रुग्णालयातील ज्यादा बिल कमी करून देण्यासाठी तरुणांची मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:19 PM2021-05-01T18:19:52+5:302021-05-01T18:26:03+5:30

Mira Bhayander News : रुग्णांना जास्त देयक आकारले असेल तर शासन दरानुसार त्याची पडताळणी करायला लावून देयकाचे पैसे कमी करण्यासाठी काकडे व काटकर यांनी मोहीम सुरु केली.

Youth campaign to reduce excessive bills in private hospitals in Mira Bhayander | खासगी रुग्णालयातील ज्यादा बिल कमी करून देण्यासाठी तरुणांची मोहीम 

खासगी रुग्णालयातील ज्यादा बिल कमी करून देण्यासाठी तरुणांची मोहीम 

Next

मीरारोड - राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी रुग्णालयातील दर निश्चित केलेले असताना अनेक खासगी रुग्णालये मात्र मनमानी शुल्क वसुली करत असल्याने या विरोधात मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या दोन तरुणांनी नागरिकांच्या मदतीसाठी सहायता मोहीम सुरु केली आहे.  त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक रुग्णांचे हजारो रुपये कमी होऊन मोठा दिलासा मिळत आहे. 

मीरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे आणि ओवळा - माजिवडा १४६ चे अध्यक्ष कुणालादित्य काटकर या दोन तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे . कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्याकडून खासगी रुग्णालयात मनमानी वसुली केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षीपासून सुरू आहेत. शासनाने खासगी रुग्णालयाच्या लूटीला आळा घालण्यासाठी उपचाराचे दर निश्चित केले आहेत. महापालिकेने सुद्धा बिलांचे ऑडिट सुरू केले आहे. तरी देखील खासगी रुग्णालयांची लूट काही थांबलेली दिसत नाही. 

रुग्णांना जास्त देयक आकारले असेल तर शासन दरानुसार त्याची पडताळणी करायला लावून देयकाचे पैसे कमी करण्यासाठी काकडे व काटकर यांनी मोहीम सुरु केली. बिलाची रक्कम जास्त वाटल्यास अडचणीतील रुग्णांच्या नातलगांना त्यांनी संपर्कासाठी ईमेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक दिले. प्रदेश काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही मोहीम सुरु केली. काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण व नातलगांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन जास्त बिल तयार करतात आणि त्याची वसुली सुद्धा सक्तीने करत असल्याच्या असंख्य तक्रारी येत होत्या असे काकडे म्हणाले. 

मीरारोडच्या पद्माकर म्हात्रे रुग्णालयाने एका रुग्णास आकारलेले जास्तीचे तब्बल दीड लाख रुपये शासन दराचा आढावा घेऊन कमी करायला लावले. श्री परमहंस रुग्णालयाविरोधात जास्त दरा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. रिद्धी सिद्धी रुग्णालयाने जास्त आकारलेले ५२ हजार ४१० रुपये तर फेमिली केअर रुग्णालयाने जास्त आकारलेले १६ हजार ७२५ रुपये कमी करून दिल्याचे काटकर यांनी सांगितले. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना शुल्क आकारल्यास रुग्णालयांचे नाव खराब होणार नाही आणि रुग्ण व नातलगांना सुद्धा दिलासा मिळेल. तोच दिलासा ह्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी सदिच्छा ठरेल असे या दोन तरुणांचे म्हणणे आहे.

Web Title: Youth campaign to reduce excessive bills in private hospitals in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.