भावाने दारु पिल्याचा जाब विचारल्याने धाकट्या भावाची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2025 19:36 IST2025-10-03T19:36:47+5:302025-10-03T19:36:47+5:30
इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन घेतली उडी; दुसऱ्या दिवशी प्रकार उघडकीस

भावाने दारु पिल्याचा जाब विचारल्याने धाकट्या भावाची आत्महत्या
ठाणे: नेहमीच दारुच्या नशेत असलेल्या सतीश यादव (२३, रा. नाैपाडा, ठाणे) याला अमित (२६) या त्याच्या माेठया भावाने जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने चंदनवाडीतील श्री जगन्नाथ एसआरए कॉम्प्लेक्सच्या विसाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाैपाडा पाेलिसांनी शुक्रवारी दिली.
चंदनवाडी भागात राहणारा सतीश हा २ ऑक्टाेबर राेजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेतच घरी आला हाेता. त्याला नशेत पाहिल्याने माेठा भाऊ अमितने त्याला जाब विचारला. याचाच राग अनावर झाल्याने त्याने त्याची बहीण वास्तव्यास असलेल्या श्री जगन्नाथ एसआरए इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. अमित आणि सतीश हे दाेघे भाऊ त्यांच्या आजीसमवेत पाटीलवाडी भागातील चाळीत रहात हाेते. तर त्यांची बहिण श्री जगन्नाथ इमारतीमध्ये वास्तव्यास हाेती. ताे या इमारतीच्या भिंतीच्या पलीकडे पडल्यामुळे रात्री काेणालाही समजले नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह स्थानिक रहिवाशांना आढळला. त्यानंतर नाैपाडा पाेलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन ताे उत्तरीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. पाेलीस उपनिरीक्षक राहूल खंडागळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.