पाहुणी आलेल्या तरुणीने मारला मैत्रिणीच्या नेकलेसवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 00:10 IST2022-01-10T00:03:48+5:302022-01-10T00:10:31+5:30
पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली.

नेकलेस हस्तगत, कासारवडवली पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली. तिच्याकडून चोरीतील २८ हजारांचा सोन्याचा नेकलेसही हस्तगत केल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील घोडबंदर रोड भागातील एका खोलीत मंजुदेवी साह (२०, रा.घोडबंदर रोड) या राहतात. त्यांच्या घरात मनीषा ही पाहुणी म्हणून दोन दिवसांपूर्वी राहण्यासाठी आली होती. दरम्यान, त्यांच्या घरात ६ जानेवारीला सकाळी १० ते रात्री १० दरम्यान अनोळखी चोरट्याने घरातील बॅगेतील २८ हजारांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला होता. याबाबत ७ जानेवारीला कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी आणि योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने तक्रारदार आणि तिच्यासोबत आलेल्या तरुणीची उलट चौकशी केली, तेव्हा तिच्यासोबत असलेल्या मनीषा हिने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर तिनेच या नेकलेसची चोरी केल्याची कबुलीही दिली. तिला या प्रकरणी ७ जानेवारीला अटक केली असून, तिच्याकडून चोरीतील नेकलेसही हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.