तोल गेल्याने सातव्या मजल्यावरुन पडून ठाण्यात तरुणीचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:33 IST2020-10-13T00:22:15+5:302020-10-13T00:33:50+5:30
स्टूलवरुन तोल गेल्यामुळे थेट सातव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली कोसळून प्रतिक्षा अशोकराव नागरगोजे (१८) या तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तिच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

कपडे वाळत घालतांना स्टूल सटकला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कपडे वाळत घालतांना स्टूलवरुन तोल गेल्यामुळे थेट सातव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली कोसळून प्रतिक्षा अशोकराव नागरगोजे (१८, रा. शास्त्रीनगर, ठाणे) या तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर येथील ‘आसावरी’ इमारतीमधील सातव्या मजल्यावरील ७०६ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये राहणारी प्रतिक्षा सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घरातील गॅलरीमध्ये स्टूलवर उभी राहून कपडे वाळत टाकण्यासाठी उभी होती. त्यावेळी स्टुलवरून अचानक तोल गेल्यामुळे सातव्या मजल्यावरील गॅलरीतून ती खाली कोसळली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागून तिचा मृत्यु झाल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन केला जाणार आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या प्रतिक्षाचा अशा प्रकारे मृत्यु ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.