धक्कादायक! ठाण्यात सिमेंट मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 22:19 IST2021-03-10T22:17:15+5:302021-03-10T22:19:02+5:30
घोडबंदर रोड येथे सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मिक्सरमध्ये तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या रफीकुल मिया (३२, रा. पश्चिम बंगाल) याचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली.

आकस्मिक मृत्युचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोड येथे सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मिक्सरमध्ये तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या रफीकुल मिया (३२, रा. पश्चिम बंगाल) याचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल ेकरण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील विहंग व्हॅलीजवळील महावीर कल्पवृक्ष कन्स्ट्रक्शन येथे काम करणारा रफीकुल मिया (सध्या रा. महावीर कल्पवृक्ष कन्स्ट्रक्शन, लेबर कॅम्प, घोडबंदर रोड, ठाणे) हा ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बॅचिंग प्लान्ट (सिमेंट मिक्सर) मध्ये रेती, खडी, सिमेंटचा माल मिक्स झाला आहे किंवा नाही? हे पाहण्यासाठी सिडीवर चढून या मिक्सर मशिनचे आॅफरवर असलेले झाकण खोलून पाहत असतांना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो मिक्सर मशिनच्या आॅफरमध्ये पडून त्यात फिरुन तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी या बांधकामाचे पर्यवेक्षक नितीन रंगानी यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केसरे हे अधिक तपास करीत आहेत.