पाच प्रकल्पांचे काम थांबवले, हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे मीरा-भाईंदर महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:11 IST2025-01-21T11:10:41+5:302025-01-21T11:11:13+5:30
Mira Road News: मीरा रोड शहरातील हवेत प्रदूषण पसरल्याबद्दल मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने टीकेची झोड उठत होती. अखेर महापालिकेने शहरातील पाच विकासकांच्या बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली आहे.

पाच प्रकल्पांचे काम थांबवले, हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे मीरा-भाईंदर महापालिकेची कारवाई
मीरा रोड - शहरातील हवेत प्रदूषण पसरल्याबद्दल मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने टीकेची झोड उठत होती. अखेर महापालिकेने शहरातील पाच विकासकांच्या बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या आदेशाने नगररचना विभागाचे सहायक संचालक पुरुषोत्तम शिंदे यांनी हे स्थगिती आदेश दिले आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या काही काळापासून वारेमाप चालणारी इमारत बांधकामे, आरएमसी प्लांट, सिमेंट रस्ते, खोदकाम, भरणी आदी कारणांनी शहरातील हवा खराब झाली आहे. हवेत सिमेंट आणि धूलिकण पसरलेले असून, श्वास घेण्यासही अनेकांना जिकिरीचे होते. शिवाय हवेतील प्रदूषणामुळे श्वास, डोळे आदी संबंधित विकारांची लागण वाढत असल्याचे सांगितले जाते. वायू प्रदूषण वाढले असताना दुसरीकडे त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ कागदी आव्हानांचे आणि बैठकांचे घोडे प्रशासनाकडून दामटवले जात होते. राजकारणी तर हवा प्रदूषणाबद्दल तोंड उघडत नाहीत, अशी स्थिती आहे. हवेतील प्रदूषणाबद्दल ‘लोकमत’मधून सातत्याने बातम्या आल्या होत्या. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम करणारे अनेक विकासकही ग्रीन नेट लावणे, पाण्याचे स्प्रिंकलर लावणे आदी उपाययोजना करताना दिसत नव्हते. त्यातूनच सुमारे ४० ते ५० बांधकामस्थळी पाहणी करून उपाययोजना करण्याचे विकासकांना बजावले होते.
दोन वेळा नोटीस देऊनही उपाययोजना नाही
अखेर दोनवेळा नोटीस देऊनही उपाययोजना न केल्याने मौजे घोडबंदर येथील विकासक अजय विजय बहादूर यादव, मौजे नवघर येथील विकासक मे. रश्मी प्रॉपर्टीजचे प्रो. प्रा. हेमेंद्र पी. बोसमिया; मौजे गोडदेव, भाईंदर येथील विकासक मे. ओस्तवाल बिल्डर्स लि., मौजे घोडबंदर येथील विकासक मे. पी. एन. के. डेव्हलपर्स आणि मौजे भाईंदर येथील विकासक मे. स्पॅन क्रिओटर्स यांना बांधकाम थांबविण्याचे आदेश १७ जानेवारी रोजी देण्यात आले आहेत.
विकासकामांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. ज्यामुळे वायुप्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. हे रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलून नियम लागू केले. प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ विकासकांच्या बांधकाम प्रकल्पांना स्थगिती देऊन काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
- संजय काटकर,
आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका.