Women's Child Welfare Committee nepal visit cancle | लोकमतचा दणका; मुदत संपलेल्या महिला बालकल्याण समितीचा नेपाळ दौरा रद्द
लोकमतचा दणका; मुदत संपलेल्या महिला बालकल्याण समितीचा नेपाळ दौरा रद्द

मीरारोड - समितीची संपलेली मुदत आणि अभ्यासाच्या नावाखाली नेपाळ या पर्यटन स्थळी १५ लाखांचा खर्च करुन चाललेली महिला बालकल्याण समितीची टूरटूर अखेर लोकमतच्या बातमी नंतर रद्द केली गेली आहे. ३० नोव्हेंबर रोजी सर्वात आधी लोकमतने नेपाळ टुरची बातमी दिली होती आणि त्याच दिवशी पालिकेने समितीची मुदत संपली असल्याने दौरा रद्द केल्याची प्रशासकिय टिप्पणी मंजुर केली.

१५ नगरसेविका असलेल्या महिला बालकल्याण समिती च्या सभापती पदी भाजपाच्या दिपीका अरोरा तर उपसभापती पदी भाजपाच्याच वंदना भावसार होत्या. भाजपाचा वरचष्मा असलेल्या सदर समितीतील भाजपा, शिवसेना व काँग्रेस नगरसेविकांनी मिळुन अभ्यास दौरा काढण्याचा ठराव जुलै मध्ये केला होता. परंतु समितीची मुदत आॅक्टोबर मध्ये संपलेली असताना देखील नोव्हेंबर मध्ये नेपाळ दौरायासाठी निवीदा मागवण्यात आल्या होत्या. केएसव्ही टुर्स एण्ड ट्रावेल्स, हेझल ट्रावेल्स एण्ड टुर्स व युक्ता हॉलीडे एण्ड इव्हेन्टस या तीन ठेकेदारांनी निवीदा भरल्या.

मात्र समितीची संपलेली मुदत आणि नेपाळ हा दुसरा देश असल्याने या आधी देखील पालिकेची परदेश दौरा करता येत नसल्याची भुमिका पाहता सदर प्रकार लोकमत ने ३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आणला होता. सदर बातमी मध्ये प्रतिक्रीया देताना आयुक्त बालाजी खतगावकर यांनी स्वत:च, समितीची मुदत संपली असल्याने दौरा मंजुर करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले होते. तर माजी सभापती असलेल्या अरोरा यांनी देखील प्रतिक्रीये मध्ये, आपण दौरा रद्द करण्याचे पत्र देऊ असे म्हटले होते. त्या अनुषंगाने अरोरा यांनी पत्र देखील दिले. काँग्रेसने दौरायाचा ठराव केल्याचे सांगुन हात झटकण्याचा प्रयत्न अरोरा यांनी केला होता.

वास्तविक अभ्यासाच्या नावाखाली आता पर्यंत नगरसेवक व अधिकारायांचे दौरे हे पर्यटन स्थळीच काढले गेले आहेत. करदात्या जनतेच्या पैशांवर हे नगरसेवक पर्यटन स्थळी मौजमजा करत असल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आलेले आहेत. पर्यटन ठिकाणीच हे दौरे काढले जात असल्याने आज पर्यंत शहराला या दौरायांचा काहीच उपयोग झाला नसुन दिवस निहाय अहवाल देखील सादर केले गेलेले नाहित.

लोकमतमध्ये ३० नोव्हेंबर रोजी सदरचे वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी पालिका प्रशासनाने समितीची मुदत संपलेली असल्याने नेपाळ दौरा रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला. शिवसेनेच्या अर्चना कदम यांनी, ठरावात नेपाळला जाण्याचा विषयच नसताना हे परस्पर कोणी ठरवले ? असा सवाल करत दौरायास विरोध केला. तर काँग्रेसच्या गीता परदेशी यांनी देखील बहुमत असणाराया भाजपाने चलाखीने आयत्या वेळी आपल्याला ठराव वाचण्यास दिला असला तरी त्यात नेपाळ दौरायाचा उल्लेखच नव्हता असे स्पष्ट करत भाजपावर झोड उठवली. भाजपाच्या काही सदस्य नगरसेविका देखील समितीची मुदत संपलेली असताना आम्हाला नेपाळ दौरायाला जायचे असल्याचे सांगण्यात आल्याच्या प्रकारा बद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

Web Title: Women's Child Welfare Committee nepal visit cancle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.