जागतिक महिला दिनानिमित्त ठाणेनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांचा संपूर्ण कारभार हा महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला होता. हा एक वेगळा अनुभव असल्यामुळे एकप्रकारे दडपणही आले होते, असे ठाणेनगरच्या प्रभारी अधिकारी मोहिनी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणेनगरमध्ये मोहिनी पाटील झाल्या वरिष्ठ निरीक्षक
ठळक मुद्दे ठाणेनगरमध्ये मोहिनी पाटील झाल्या वरिष्ठ निरीक्षकनौपाडयामध्ये मोहिनी कपिलेंकडे होती सूत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: महिला दिनानिमित्तठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व सूत्रे ही महिला अधिका-यांनी सांभाळली. यावेळी रविवारी संपूर्ण दिवसभर प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक मोहिनी पाटील यांनी कार्यभार सांभाळला. नौपाडा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे महिलांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ७ मार्च रोजी ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सूर्यवंशी यांनी विशेष सत्कार केला. तर ८ मार्च रोजी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक यांची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक पाटील तर गुन्हे निरीक्षक यांची सूत्रे पूनम ढवळे यांच्याकडे होती. ढवळे यांच्याकडेच ठाणे अमलदार असाही पदभार होता. याव्यतिरिक्त ठाणे अंमलदार मदतनीस पोलीस हवालदार कावळे आणि पोलीस नाईक कुसिता वळवी यांनी काम पाहिले. आॅपरेटर म्हणून पोलीस कान्स्टेबल वंदना चौगुले या कार्यरत होत्या. तर बीट मार्शल डयूटीवर पोलीस कॉन्स्टेबल रंजिता कोकणी आणि उज्वला ठोंबरे यांनी जबाबदारी सांभाळली. तर लॉक अप डयूटी पोलीस नाईक अश्विनी गिरी आणि चंद्रभागा वायाळ यांच्याकडे दिली होती. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांभाळली.
‘‘ वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून वेगळा अनुभव होता. एक वेगळी जबाबदारी आल्याने दडपणही होते. या काळात लॅपटॉप प्रकरणातील आरोपीला गुन्हे प्रकरटीकरण पथकांच्या मदतीने २४ तासात अटक केली. होळीनिमित्त पेट्रोलिंगही केले. हरविलेल्या दोन मुलांचाही शोध घेतला.’’ मोहिनी पाटील, प्रभारी अधिकारी, ठाणेनगर
‘‘ ठाणे अंमलदार म्हणून पदभार तसा नेहमीच असतो. पण रविवारी खास अनुभव मिळाला. बाजारपेठेतील वादाचे प्रकरण हाताळले. एकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ’’ पूनम ढवळे, ठाणे अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक, ठाणेनगर.
Web Title: Women officers handled all the sources of Thane Nagar and Naupada Police Station on the occasion of Women's Day.