शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 17:07 IST2020-11-30T17:00:25+5:302020-11-30T17:07:14+5:30
Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली.

शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट!
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील राजकीय केंद्र बनलेल्या कलानी महलला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख अरुण अशान आदींनी सदिच्छा भेट देऊन ज्योती कलानी, ओमी कलानी यांच्या सोबत चर्चा केली. या भेटीने राजकीय आराखडे बांधले जात असून दुसरीकडे टीकाही होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली. महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांना शिवसेनेने फोडून महापौर पदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना निवडून आणले आहे. यावेळी ओमी कलानी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असून ओमी टीम समर्थक १० नगरसेवकांनी भाजपाच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखविली.
महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान, उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आल्यानंतर, स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर सदस्याला सूचक, अनुमोदक देऊन सभापतीपदी निवडून आणले. तेव्हापासून ओमी टीमचा शहर शिवसेने सोबत घरोबा वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. यातूनच पुढे महापालिका सत्ता अबाधित राखण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कलानी महलला भेट देऊन ओमी कलानी, ज्योती कलानी व कलानी समर्थकांसोबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
शहरातील राजकारणात कलानी कुटुंबाचे वर्चस्व राहिले असून पप्पू कलानी २० तर ज्योती कलानी ५ असे एकून २५ वर्ष आमदारपद कलानी कुटुंबात राहिले आहेत. तसेच ज्योती व पंचम कलानी महापौरपदी राहिल्या असून ज्योती कलानी सलग ७ वर्ष स्थायी समिती सभापतीपदी होत्या. तसेच, शहराचे नगराध्यक्षपदही कलानी कुटुंबांनी भूषविले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली असून भाजप सोबत महाआघाडी केली.
ओमी टीमचे समर्थक उमेदवारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. ओमी टीमच्या पाठिंब्यामुळे कधी नव्हेतर भाजपाचे ३२ नगरसेवक निवडून आले. मात्र सत्तेसाठी स्थानिक साई पक्षाची मदत घेऊन भाजपचा महापौर तर साई पक्षाचा उपमहापौर निवडून आले. विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने भाजप व ओमी कलानी टीम मध्ये वाद झाला असून सध्या ते शिवसेने सोबत असल्याचे भासवित आहेत.
महापालिका सत्तेसाठी शिवसेना कलानी दरबारी?
महापालिकेत भाजपाचे बहुमत असताना ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांच्या बंडखोरी मुळे भाजपाची सत्ता जाऊन शिवसेना आघाडी सत्तेत आली. यापुढेही महापालिकेतील सत्ता अबाधित राखण्यासाठी शिवसेना नेते व खासदार कलानी दरबारी ओमी कलानी व ज्योती कलानी यांच्या सदिच्छा भेटीसाठी गेल्याचे बोलले जात आहे.