will look into it afterwards says yuva sena chief aaditya thackeray on dahanu vadhavan port | आरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'

आरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'

पालघर: आरे तील मेट्रो कारशेड वरून सरकारला नाणारसारखे झुकवू असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर डहाणूच्या वाढवण बंदरासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारल्यावर "नंतर बघू" असे वक्तव्य केल्याने डहाणूतील जनतेने संताप व्यक्त केला आहे. आदित्य यांच्या वक्तव्याचा वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह प्राधिकरण बचाव संघर्ष समितीने निषेध केला आहे. काहींनी तर आदित्य ठाकरेंना ट्विट करून आम्ही तुम्हाला आशीर्वाददेखील निवडणुकीनंतर देऊ असे सुनावले आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडला तीव्र विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरेंनीदेखील नाणार जे झालं, तेच आरेचं होणार, असा इशारा देत आरेतील कारशेडविरोधात भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीच्या भाजप सरकारच्या हालचाली सुरू झाल्या असतानाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळेच जनसेवा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वाढवण बंदराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नंतर बघू असे उत्तर आदित्य यांनी दिले. त्यांच्या या उत्तराचे डहाणूसह सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटले आहेत. 

पालघर विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारादरम्यान चिंचणी येथे झालेल्या एका जाहीर सभेत वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्ण विरोध असेल, असे जाहीर वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले होते. लोकांचा विरोध असेल, तर हे बंदर शिवसेना कदापि होऊ देणार नाही. या बंदराविरोधातील आंदोलनात माझे सर्व शिवसैनिक सहभागी होतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. या वक्तव्यावर विश्वास ठेवून पालघर विधानसभा मतदार संघातील किनारपट्टीवरील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकून आमदार अमित घोडा याला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते.

भाजपकडून वाढवण बंदर उभारणीसाठी संरक्षण कवच ठरलेले डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणच बरखास्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आक्षेप घेणार आहे. हे प्राधिकरण हटवल्यास आपोआपच वाढवण बंदराचा मार्ग मोकळा होईल, असे वाढवण बंदर संघर्ष समितीचे म्हणणे आहे. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवणवासीयांना दिलेल्या शब्दाप्रमाणे बंदराच्या आणि संरक्षण प्राधिकरण हटविण्याविरोधात सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शवावा अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या विधानाने स्थानिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 
 

Web Title: will look into it afterwards says yuva sena chief aaditya thackeray on dahanu vadhavan port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.