शहापूरातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:45 IST2019-06-11T20:44:04+5:302019-06-11T20:45:13+5:30
एकनाथ शिंदेंचे आश्वासन

शहापूरातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- एकनाथ शिंदे
ठाणे: शहापूर तालुक्यातील ९७ गावे व २५९ पाड्यांना टंचाईमुक्त करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी मिळवून देणे आवश्यक असून त्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासोबत चर्चा करून या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार पांडुरंग बरोरा, ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे, महसूल विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शिंदे म्हणाले, शहापूर तालुक्यातून मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०१९-२० मध्ये प्रस्तावित असून याबाबत राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिलेली असून प्रशासकीय मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करून ही गावे टंचाई मुक्त करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान, शहापूर तालुक्यातील प्रशासकीय इमारती व क्रीडा संकुल यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.