एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:02 IST2025-10-16T11:01:17+5:302025-10-16T11:02:35+5:30
आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी अभ्यास वर्गाचे आयोजन भाजपाने पक्ष कार्यालयात केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
ठाणे - ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर बसवण्याकरिता पक्षाने बारीक सारीक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेतील ३३ प्रभागांतील इच्छुकांची आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे. पक्षाची धोरणे, भूमिका याबाबत उमेदवाराला किती माहिती आहे. त्याने पक्षाकरिता, प्रभागात काय काम केले आहे अशा वेगवेगळ्या बाबींचे निकष लावून इच्छुकांची हजेरी घेतली जाईल. या अभ्यास वर्गाला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाची धोरणे, भूमिका, निकष आणि पक्षासाठी काय काय करू शकता या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी अभ्यास वर्गाचे आयोजन भाजपाने पक्ष कार्यालयात केले आहे. इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र भरून घेण्यात येणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभ्यास वर्गासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या अभ्यास वर्गात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक आणि शहराध्यक्ष संदीप लेले हे मार्गदर्शन करणार असून इच्छुक उमेदवारांकडून भाजपच्या शाळेतील अभ्यासाचे धडे गिरवून घेणार आहेत. राज्यात सत्तेवर असलेली महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे शिंदे सेनेवर सातत्याने टीका करत आहेत तर खासदार नरेश म्हस्के हे नाईकांच्या वक्तव्यांना प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे ठाण्यातील महायुतीमधील संबंध ताणले गेले आहेत.
महापौरपदावरून राजकीय चकमक
महापौरपद भाजपाच्या वाट्याला यावे, अशी इच्छा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. ठाण्याचा महापौर भाजपचाच झाला पाहिजे, हाच आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा ठाम विश्वास आहे, असे ते म्हणाले. या विधानावर प्रत्युत्तर देताना शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर कुणाचा होणार हे जनता ठरवेल, असे प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या ३३ प्रभागांतील इच्छुकांच्या शिबिरात स्वबळावरची तयारी करून घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
फॉर्म भरावा लागणार
३३ प्रभागांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सुरुवातीला परिचय पत्राचा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामध्ये स्वतःची माहिती, मतदार यादीतील क्रमांक, जातीचा उल्लेख (आरक्षण पडल्यास त्या दृष्टीने विचार करण्यासाठी) पक्षासाठी काय केले आतापर्यंत त्याची माहिती, नगरसेवक नसाल तर एक कार्यकर्ता म्हणून काय काय काम केले त्याची माहिती भरावी लागणार आहे.