ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा

By संदीप प्रधान | Published: February 12, 2024 05:56 AM2024-02-12T05:56:09+5:302024-02-12T05:57:02+5:30

ठाण्यातील हे सेंट्रल पार्क पीपीपी तत्त्वावर कल्पतरू या बांधकाम कंपनीच्या मदतीने उभे राहिले.

When will Thanekars get Aquarium, Planetarium?; A lack of entertainment places in Thane | ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा

ठाणेकरांना मत्स्यालय, तारांगण कधी मिळणार?; करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा

ठाणे जिल्ह्यातील एकाही शहरात म्युझियम, मत्स्यालय, राणीचा बाग, तारांगण, सायन्स सेंटर, स्नो पार्क वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी अथवा सुटीच्या दिवशी मुलाबाळांना घेऊन फिरायला जायचे तर लोकल प्रवास अटळ आहे. ठाण्यात नव्याने उभ्या राहिलेल्या नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणेकरांच्या करमणुकीचा प्रचंड मोठा अनुशेष काहीअंशी भरला गेला. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईशी स्पर्धा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यात करमणुकीच्या साधनांची प्रचंड वानवा आहे.

ठाण्यातील हे सेंट्रल पार्क पीपीपी तत्त्वावर कल्पतरू या बांधकाम कंपनीच्या मदतीने उभे राहिले. महापालिकेच्या मालकीच्या २० एकर जमिनीवर उभ्या राहिलेल्या या सेंट्रल पार्कमध्ये बगीचे, कारंजी, तलाव वगैरे सुविधा आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वृक्षवल्ली आहे. येथे फिरायला गेल्यावर मन प्रफुल्लित होणे स्वाभाविक आहे. येथे नियमित चालल्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. सुरुवातीला येथील सुविधा उत्तम राहतील. मात्र, जर त्याची देखभाल व्यवस्थित झाली नाही तर अवकळा यायला वेळ लागणार नाही. अशा सुविधांची वाट लावणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर नजर ठेवण्याकरिता सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे असायला हवेत. महापालिकेने येथे प्रवेश फी ठेवली हे उत्तम झाले.

लोकानुनयाची फुकट संस्कृती अशा सुविधांच्या मुळावर येते. अर्थात प्रवेश फी नाममात्र आहे. त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून एवढ्या विस्तीर्ण पार्कची देखभाल ठेवणे कठीण आहे. माजी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कल्पनेतून ठाण्यात बाॅलिवूड पार्क उभे राहिले. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची मदत महापालिकेने घेतली. मात्र, काही पुतळे बसवण्यापलीकडे तेथे काही झाले नाही. कालांतराने ठेकेदारावर कारवाई झाली आणि बाॅलिवूड पार्ककडे ठाणेकरांनी पाठ फिरवली. अखेर त्याला कुलूप लागले. 

स्नो पार्क व मत्स्यालय ठाण्यात उभे करण्याच्या घोषणा अगदी आर. ए. राजीव आयुक्त होते तेव्हापासून केल्या जात आहेत. परंतु, अजून कशात काही पत्ता नाही. त्यामुळे ठाण्यातील काही मॉल्समध्ये रविवारी सायंकाळी फेरफटका मारून अनावश्यक खरेदी करणे व फूड कोर्टात आडवा हात मारून पोटाचा घेर वाढवणे या पलीकडे ठाणेकर काही करत नाहीत. ठाण्यात पाच ठिकाणी खाडीकिनारी चौपाटी उभी करण्यात महापालिकेला यश आले. त्यामुळे काही लोकांना तेथे फिरायची संधी मिळाली.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर वगैरे शहरांत तर करमणुकीच्या ठिकाणांची अधिकच वानवा आहे. दुर्गाडी चौपाटी, कल्याणचा काळा तलाव, गौरीपाड्याचा सिटी पार्क, डोंबिवली रेतीबंदर अशी काही मोजकीच ठिकाणे व मॉल्स येथेच डोंबिवलीकर घुटमळतो. 
ठाण्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवलीत फिरायच्या सोयी-सुविधा निर्माण व्हायला हव्या. डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरात मोठमोठी शहरे पुढील दोन-पाच वर्षांत उभी राहणार आहेत. येथे वास्तव्य करणाऱ्यांना म्युझियमपासून मत्स्यालयापर्यंत आणि राणीच्या बागेपासून तारांगणापर्यंत सुविधा कधी मिळणार? याचे उत्तर तूर्त तरी ‘नाही’ हेच आहे.

Web Title: When will Thanekars get Aquarium, Planetarium?; A lack of entertainment places in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.