What did Ravindra Angre, an encounter specialist with the notorious gangster, Suresh Manchekar, who had killed 4 gangsters on the Hyderabad encounter? | हैद्राबाद चकमकीवर कुख्यात गँगस्टर सुरेश मंचेकरसह ५३ गुुंडांचा खात्मा करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे काय म्हणाले ?
ठाण्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविल्या प्रतिक्रीया

ठळक मुद्दे चकमकफेम काशीनाथ कचरे म्हणाले... अशा चकमकीही काळाची गरजठाण्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविल्या प्रतिक्रीया

जितेंद्र कालेकर
ठाणे: हैद्राबाद बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या चकमकीत मारले गेल्यानंतर संपूर्ण देशभरातून जशा वेगवेगळया प्रकारच्या प्रतिक्रीया उमटल्या तशा त्या ठाण्यातील एकेकाळी चकमकफेम अधिकारी म्हणून प्रसिद्धीस असलेल्या अधिकाऱ्यांमध्येही उमटल्या आहेत. अत्यंत किळसवाणे कृत्य केल्यानंतर पुन्हा पोलिसांवर जर हल्ला करण्याची हिंमत होत असेल तर अशा चकमकी होणे गरजेचे असल्याची परखड प्रतिक्रीया निवृत्त सहायक पोलीस आयुक्त काशीनाथ कचरे यांनी व्यक्त केली आहे. तर ते आरोपी हे संशयित होते. प्रत्यक्ष साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणेही बाकी होते. त्यामुळे आरोपी चकमकीत ठार होणे, हेही चुकीचे असल्याचे मत निवृत्त पोलीस निरीक्षक तथा काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहे.
साधारण १५ वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये सुरेश मंचेकर, छोटा राजन, अरुण गवळी अशा वेगवेगळया टोळयांनी मुंबई ठाण्यात खंडणी उकळण्यासाठी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याच काळात १९९२ ते २००० मध्ये मुंबई गुन्हे अन्वेषण विभागामध्ये तर २००० ते २००६ या काळात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये आंग्रे चकमकफेम अधिकारी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी कोल्हापूरात सुरेश मंचेकर तर ठाण्यात चिकना बाबू, रवी पुजारी आणि प्रकाश सुर्वे अशा ५३ नामचीन गुंडांचा चकमकीत खात्मा केला. आंग्रे आपली प्रतिक्रीया व्यक्त करतांना म्हणाले, हैद्राबाद प्रकरणातील आरोपी हे संशयित होते. गुन्हा सिद्ध होणे बाकी होते. अशा परिस्थितीमध्ये पुरावे गोळा करणे, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे हेही त्यांचे काम होते. गुन्हयाची बाबी न्यायालयासमोर येणे अपेक्षित होते. मात्र, ते गुन्हयाच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे नेमकी पोलिसांवर या गुन्हेगारांकडूनच झाल्याचे बोलले जाते. तिथे नेमकी काय प्रकार घडला, हे सांगता येणार नाही. पण न्यायालयासमोर आरोपींना हजर करणे हे पोलिसांचे काम आहे. प्रत्यक्षात न्याय करणे हे पोलिसांचे काम नाही. आमच्या काळात खबरीने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी सापळा लावायचो. तिथे त्याच्याकडून गोळाबार झाल्यानंतर स्वसंरक्षणार्थ गोळीबार करायचो, असेही आंग्रे म्हणाले.
याच काळात आणखी नाव गाजले ते ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक दत्ता घुले यांचे. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये १९९९ ते २००१ या काळात घुले यांचा गुन्हेगारांवर चांगलाच दबदबा होता. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बडोदा येथून मंचेकर टोळीची सूत्रे चालविणा-या देवेंद्र कारेकर याचा बडोदा येथे जाऊन घुले यांच्या पथकाने एन्काऊंटर केला होता. अशा १५ जणांचा घुले यांनी चकमकीत खात्मा केला. झाले ते योग्यच झाले, अशा शब्दात घुले यांनी हैद्राबादच्या घटनेबद्दल प्रतिक्रीया व्यक्त केली. असे गुन्हेगार पोलिसांवर दगडफेक करीत असतील आणि त्यांची हत्यारे हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करीत असतील तर त्यांच्याकडून एखादा पोलीस मारला जाण्याचे वाट पाहणे हेही संयुक्तिक नाही, असेही घुले म्हणाले.


तर हैद्राबादसारखी चकमक ही काळाची गरज असल्याचे मत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी काशीनाथ कचरे यांनी व्यक्त केले आहे. बलात्कार आणि खून करण्यासारखे अत्यंत हिनस कृत्य केल्यानंतर पुन्हा पोलिसांवर हल्ला करणा-यांवर अशीच कारवाई अपेक्षित होती. यातूनच काहीतरी पोलिसांची जरब निर्माण होईल. २००१ ते २००६ या काळात पोलीस निरीक्षक असतांना मुंब्य्रातील छोटे खान , ठाण्यातील छोटा गण्या याच्यासह नऊ जणांचा खात्मा कचरे यांनी केला होता.

कारवाई व्हावी... पण हे अपेक्षित नाही - डॉ. बेडेकर
गुन्हेगारांवर कारवाई व्हावी. पण अशा प्रकारे चकमकीत आरोपी मारले जाणे हे अपेक्षित नसल्याचे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, संविधानाला आपण मानणार असू तर सर्व कारवाई ही कायद्यानेच होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये अशा प्रकारची कारवाई बसणार नाही. मग काय केले पाहिजे. तर अशा घटना फास्ट ट्रॅकवर आल्या पाहिजेत. पाश्चात देशातही अशा वाईट घटना घडतात. पण तिथे वर्षभराच्या आतच न्याय दिला जातो. तसेच भारतातही अपेक्षित आहे.

Web Title:  What did Ravindra Angre, an encounter specialist with the notorious gangster, Suresh Manchekar, who had killed 4 gangsters on the Hyderabad encounter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.