ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या ११९ गावखेड्यांना १९ टँकरव्दारे पाणी पुरवठा; मुरबाड तालुका दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:35 IST2019-04-11T16:29:04+5:302019-04-11T16:35:42+5:30
शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यामधील डोंगर, पठारावरील आदिवासी गावपाड्याना पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे वास्तव असून जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना अहवालावरून दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ३७ हजार २२३ लोकसंख्येच्या गावखेड्यांना १९ खाजगी टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मागील आठवड्यात ३० हजार ९६९ लोकसंख्येच्या ९७ गांवखेड्यांमध्ये १७ टँकरव्दारे पाणी पुरवठा झाला.

मुरबाड तालुक्यासह अंबनाथ, भिवंडी तालुक्यातील पाणी समस्येकडे मात्र दुर्लक्ष
ठाणे : पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या शहापूर तालुक्यातील ११९ गावपाड्यांना सध्या १९ खाजगी टँकरव्दारे पाणी पुरवठा करून या तीव्र पाणी टंचाईवर मात केली जात आहे. मात्र मुरबाड तालुक्यासह अंबनाथ, भिवंडी तालुक्यातील पाणी समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरधरू लागला आहे. लोकशाहीच्या या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याऐवजी जिल्ह्याच्या गावखेड्यातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या शोधात दिसून येत आहेत. शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यामधील डोंगर, पठारावरील आदिवासी गावपाड्याना पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे वास्तव असून जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना अहवालावरून दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ३७ हजार २२३ लोकसंख्येच्या गावखेड्यांना १९ खाजगी टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मागील आठवड्यात ३० हजार ९६९ लोकसंख्येच्या ९७ गांवखेड्यांमध्ये १७ टँकरव्दारे पाणी पुरवठा झाला.
जीव घेण्या उन्हामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसनदिवस उग्ररूप घेत आहे. मागील वर्ष या कालावधीत शहापूर तालुक्यात केवळ २८ गावपाड्यांना नऊ टँकर पाणी पुरवठा करीत होते. यंदा गावपाड्यांसह टँकरच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. यामध्ये २८ गावे आणि ९१ आदिवासी पाड्यांचा समावेश असून त्यांच्या ३७ हजार २२३ ग्रामस्थाना टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मुरबाड तालुक्यातील डोंगर उतारावली गावपाडे तीव्र पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याप्रमाणेच अंबरनाथ वभिवंडीच्या गावखे्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात टंचाई सुरू आहे. त्यांच्यासाठी ही वेळीच टँकरने पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा गावकऱ्यांकडून होत आहे.