उल्हासनगरातील आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी मतदारांची नोंद; मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:56 IST2025-12-08T18:54:57+5:302025-12-08T18:56:29+5:30
निर्जनस्थळी मतदार दाखविणाऱ्या कारवाईची मागणी

उल्हासनगरातील आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी मतदारांची नोंद; मनसेचा आरोप
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत बंद पडलेल्या आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी शेकडो मतदाराच्या नोंदीवर मनसेने आक्षेप घेतला. एकाही घराची नोंद नसणाऱ्या निर्जनस्थळी शेकडो मतदाराची नोंदणी दाखविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यात जाणीवपूर्वक घोळ केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सत्ताधारी नेते करीत आहेत. त्यानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्याना सोबत घेऊन हरकतीनुसार प्रभाग रचनेची व हद्दीची पाहणी केली. त्यानंतरही मतदार याद्या अपडेट होणार का? याबाबत राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला. प्रारूप मतदार यादीत दुबार, तीबार नावे असणे, स्थलांतरित आणि मृत मतदारांच्या नावांचा भरणा असणे, मतदार सध्या ज्या प्रभागात राहत असतील, त्यांची नावे इतर प्रभागात टाकणे. आदी त्रुटी मतदार याद्यात असल्याचा आरोप सर्वच राजकीय नेत्याकडून होत आहे. तसेच बंद असलेल्या अमरडाय व आयडीआय कंपनीच्या निर्जन ठिकाणी शेकडो मतदारांची नोंदणी कशी? कसा प्रश्न विचारला जात आहे.
महापालिका प्रारूप मतदात यादीतील या त्रुटीमुळे हजारो नागरिक मतदानाला मुकत असल्याने, एकूण मतदानाची टक्केवारी ६० ते ६५ टक्क्यांच्यावर जात नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. प्रभाग क्रं-१ च्या प्रारूप मतदार याद्यांमधील स्थलांतरित आणि समाविष्ट केलेली इतर प्रभागांमधील मतदारांची नावे वगळून, प्रभागात राहत असलेल्या आणि इतर प्रभागातील प्रारूप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची नावे प्रभाग क्रमांक १ च्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. अशी हरकत मनसेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती मैनूद्दीन शेख यांनी दिली. मतदान यादीतील घोळ दूर झाला नाहीतर, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे संकेत शेख यांनी दिले.
निवडणूक आयोगाकडून यादी
प्रभाग क्रं-१ मधील बंद पडलेल्या आयडिआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी एकही घर नसताना शेकडो मतदाराची यादी कशी? अशी विचारणा महापालिका निवडणूक विभाग प्रमुख मनीष हिवरे यांच्याकडे केली असता, या मतदार याद्या निवडणूक आयोगाकडून आल्याचे त्यांनी सांगितले.