Maharashtra Election 2019 :मतदान करा अन् आरोग्य तपासणीचा लाभ घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:38 IST2019-10-21T00:25:11+5:302019-10-21T06:38:05+5:30
Maharashtra Election 2019 : रेल्वे स्थानकात अनोखा उपक्रम

Maharashtra Election 2019 :मतदान करा अन् आरोग्य तपासणीचा लाभ घ्या
- पंकज रोडेकर
ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मॅजिक दिल संस्थेने मतदान करणाऱ्या मतदात्याने शाई लावलेले बोट दाखविल्यास त्याची मोफत आरोग्यतपासणी करुन देण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरील संस्थेच्या सर्व ‘वनरूपी क्लिनिक’मध्ये ही सुविधा उपलब्ध केली असून ठाणेकरांसह मुंबईकर मतदात्यांनी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाने विधानसभा-२०१९ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी पथनाट्य, रॅली यांच्याबरोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याज्या भागांत मतदानाची टक्केवारी कमी होती, त्यात्या भागांचा शोध घेऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने पोस्टर्स आणि बॅनरद्वारे मतदारांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘रन फॉर व्होट’ अशी एक दौडही आयोजित केली होती. त्यातच, मॅजिक दिल या सामाजिक संस्थेनेही मतदारराजाला मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही नामी शल्लक लढवली आहे.
या सेवांचा मिळणार आहे लाभ
मतदान केल्यानंतर मध्य-पश्चिम रेल्वेवरील १९ क्लिनिकमध्ये डॉक्टर सल्ला, बीपी आणि मधुमेह तसेच ईसीजी यासारख्या काही आरोग्यसेवांचा लाभ मतदात्यांना संस्थेमार्फत मोफत दिला जाणार आहे. ठाण्यासह कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ,भांडुप, घाटकोपर, सायन, कुर्ला, चेंबूर या स्थानकांसह अन् स्थानकांवर ही सुविधा मिळणार आहे.