ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 25, 2025 14:26 IST2025-10-25T14:25:55+5:302025-10-25T14:26:25+5:30
Vithabai, oldest living person in Maharashtra passes away: या आजीबाईंनी आपल्या शतकभराच्या आयुष्यात काळाचे अनेक टप्पे, बदलती पिढी, परंपरा आणि संस्कृतीचे रूपांतर जवळून अनुभवले.

ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
Vithabai, oldest living person in Maharashtra passes away | प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्रातील वयाने सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या विठाबाई दामोदर पाटील (वय ११४) यांचे आज सकाळी ६ वाजता निधन झाले. पाच पिढ्या आपल्या छायेखाली वाढताना पाहण्याचे भाग्य लाभलेल्या या आजीबाईंनी आपल्या शतकभराच्या आयुष्यात काळाचे अनेक टप्पे, बदलती पिढी, परंपरा आणि संस्कृतीचे रूपांतर जवळून अनुभवले.
दरवेळी काठी टेकत मतदान केंद्रात हजेरी लावणाऱ्या विठाबाई या लोकशाहीच्या संस्कारांचा जिवंत आदर्श होत्या. त्यांना पाहण्यासाठी मतदारांच्या रांगाही वाट पाहत असत. पत्रकारांनीही दरवेळी त्यांच्या कौतुकाने बातम्या केल्या होत्या. देश बदलला, सरकारे बदलली, पण मतदानाचा त्यांचा निश्चय कधीच ढळला नाही.
विठाबाई यांचा जन्म १९११ साली शिळगाव (कल्याण) येथे झाला. विवाहानंतर त्या कोपरी गावात स्थायिक झाल्या. आयुष्यभर आगरी-कोळी परंपरेचे मूल्य, कष्ट आणि मातीशी नाळ जपणाऱ्या या कणखर मातोश्री होत्या. त्यांच्या मागे सहा मुले, सहा सुना, नातवंडे, पतवंडे असे मोठे कुटुंबीय जाळे आहे. त्या गवदेवीचे अध्यक्ष यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कार सकाळी ११ वाजता कोपरी स्मशानभूमी येथे करण्यात आले. परंपरेनुसार १०० वर्षे पार केलेल्या ज्येष्ठांना आदरार्थ भजन मंडळ, ब्रास बँड आणि फटाक्यांच्या साक्षीने अंत्ययात्रेला सन्मान दिला जातो, तसा त्यांचा सन्मान करण्यात आला.
“ही आमच्या समाजाची कृतज्ञतेची परंपरा आहे,” असे नात जावई हेमंत पाटील यांनी सांगितले. विठाबाईंच्या जाण्याने कोपरी गावावर एक युग संपल्याची भावना दाटून आली आहे.