आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:36 AM2021-05-10T09:36:12+5:302021-05-10T09:38:56+5:30

लसीकरणाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी जात असलेल्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सर्वेक्षणादरम्यान आदिवासी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, ‘कोरोना लस म्हणजे काय?’ असा सवालच शिक्षकांना केला जात आहे.

Villagers fled to the forest after seeing the health team, utter ignorance about vaccination | आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ

आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ

Next

शाम धुमाळ -

कसारा
: लसीकरणासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. ऑनलाईन नावनोंदणी करीत लसीकरण प्रक्रिया सर्व शहरी व ग्रामीण भागांत सुरू आहे; परंतु शहापूर तालुक्यातील गावपाडे या ऑनलाईन प्रक्रियेमुळे लसीकरणापासून वंचित राहणार आहेत. कसारा परिसरातील दापूर, सावरवाडी, थऱ्याचा पाडा, तेलमपाडासह १२ पाड्यांत ऑनलाईन नाेंदणीसाठी नेटवर्कचा 'खो' असल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेस अडथळे येत आहेत.

दुसरीकडे गावपाड्यात ‘कोरोना लस म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला जात आहे; तर काही ठिकाणी लस घेण्याबाबत भीतीचे वातावरण आहे. बहुतांश पाड्यांत लसीकरणाला विरोध होत असून, लस घेतल्याने माणूस दगावतो अशी भीती कसारा परिसरातील १२ पाड्यांतील आदिवासी बांधवांमध्ये आहे. यासाठी अतिदुर्गम गावापाड्यांत लसीकरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.

लसीकरणाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी जात असलेल्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सर्वेक्षणादरम्यान आदिवासी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, ‘कोरोना लस म्हणजे काय?’ असा सवालच शिक्षकांना केला जात आहे. तर काही ठिकाणी शिक्षकांना वैयक्तिक माहितीही दिली जात नाही. काही ठिकाणी आरोग्याविषयी माहिती घेण्यासाठी स्वयंसेवक, शिक्षक गेलेले दिसताच घराचे दरवाजेच बंद करण्यात येतात. कसारा परिसरातील टोकरवाडीसह पाच पाड्यांत तर तापाचे रुग्ण तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला पाहून बहुतांश नागरिक जंगलात निघून गेले होते. गावापाड्यांत मोबाईल नेटवर्कचा व समुपदेशनचा अभाव असल्याने कोरोना व लसीकरणापासून ते अनभिज्ञ आहेत.

उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणात अडथळे 
कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत एकूण सहा उपकेंद्रे आहेत. वाशाळा, मोखवणे, विहिगाव, अजनुप, शिरोळ, ढाकणे या उपकेंद्रांत वीजपुरवठा नसल्याने, मोबाईल नेटवर्क नसल्याने व आरोग्यसेवकांची कमतरता असल्यामुळे उपकेंद्रात लसीकरण अद्याप सुरू नाही. त्यामुळे या भागातील बहुतांश नागरिक लसीकरणाच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसते.

कर्मचारी मोजकेच, कामाचा प्रचंड ताण
कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांश कर्मचारी शहापूर कोविड सेंटरला तात्पुरत्या सेवेसाठी घेतल्याने तालुक्यातील सर्वांत जास्त ओपीडी असलेल्या कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर व कार्यरत एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामाचा ताण पडत आहे. २०० च्या पुढे रोजचे रुग्ण, लसीकरण, कोरोना रुग्ण यासह अन्य कामांचा ताण या अपुऱ्या कर्मचारी वर्गांवर येत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणास अडथळे येत आहेत.

आरोग्यसेवकांची टीम तयार करा
कसारा व परिसरातील गावपाड्यांत ऑफलाईन लसीकरण करण्यासाठी व कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी तयार करण्याकरिता सामाजिक संस्था व आरोग्यसेवक यांचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी दिल्यास गावापाड्यांतील नागरिकांचे समुपदेशन होऊ शकते.

आमच्या परिसरातील अनेक पाड्यांत अजूनही पुरेशी वीज, पाणी, पुरेसे रस्ते नाहीत. त्यामुळे मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम अनेक ठिकाणी आहे. परिणामी कोरोना लसीकरणाच्या ऑनलाईन प्रक्रिया या भागात होत नाहीत.
- गणेश वाघ, ग्रामस्थ, विहिगाव

रुग्णालयात गेलो की कोरोना होईल. मग माणूस मरतो, असा गैसमज ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांत पसरला आहे. त्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.
- दत्ता वाताडे, 
ग्रामस्थ, चिंतामणवाडी

अंधश्रद्धांचा बाजार
जिल्ह्यातील इतर दुर्गम भागांप्रमाणेच कसारा परिसरातील गावपाड्यांमध्येही लसीकरणाबाबत अंधश्रद्धांचा अक्षरश: बाजार भरला आहे. तो दूर करण्यासाठी जगजागृती गरजेची आहे.
 

Web Title: Villagers fled to the forest after seeing the health team, utter ignorance about vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.