Video: मनसेचा दणका! मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या 'त्या' गुजराती व्यक्तीनं मराठीत मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 17:35 IST2019-09-16T17:31:17+5:302019-09-16T17:35:11+5:30
शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

Video: मनसेचा दणका! मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या 'त्या' गुजराती व्यक्तीनं मराठीत मागितली माफी
ठाणे: शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याने पैठणकर आणि त्यांच्या घरातील सदस्यांना हसमुख शहा पिता-पुत्राने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मनसेकडून या प्रकाराची दखल घेण्यात आली होती.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हसमुख शहा जिथे कुठे भेटेल त्याला मारल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यातच आता अविनाश जाधवने हसमुख शहाला कान पकडून महाराष्ट्रातील मराठी जनतेची मराठी भाषेत माफी मागण्यास सांगितली. या प्रकरणाचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
अविनाश जाधव यांनी हसमुख शहाने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याने मराठी माणसाला हात लावाल तर हात तोडू असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर हसमुख शहाला पकडून मराठी माणसाला मारहाण केल्याप्रकरणी कान पकडून महाराष्ट्रातील मराठी जनतेची मराठी भाषेत माफी मागण्यास सांगितली. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कॅमेरा समोर मारहाण व शिवीगाळ न करण्यास सांगितल्याने कॅमेरा समोर मारहाण करणार नसल्याचे देखील अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
सुयश सोसायटीतील पैठणकर यांना याच इमारतीत राहणाऱ्या हसमुख यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ११ सप्टेंबरला घडली. याप्रकरणी राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकत्याच तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो ठाण्यात चर्चेचा विषय ठरला असून त्यात मराठीविरुद्ध गुजराती असा रंग दिल्याने चीड व्यक्त होत आहे.